पिंपरी : महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांनी मतदारांना खूश करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन, पर्यटन, धार्मिक स्थळांच्या सहलींवर कोट्यवधींचा खर्च केला आहे. एकीकडे नोटाबंदीमुळे नागरिकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असताना, इच्छुक मात्र प्रत्येक कार्यक्रमांवर लाखों रुपयांचा खर्चाचा चुराडा करीत असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फेब्रुवारी २०१७ च्या दुसऱ्याच आठवड्यात महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यांच्या पहिल्या आठवडयात कधीही आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर निवडणूक विभागाकडून इच्छुकांच्या खर्चाच्या तपशिलाच्या नोंदी ठेवल्या जातील. निवडणूक खर्चाला मर्यादा येणार असल्याने अगोदरच खर्च करण्यास इच्छुकांनी प्राधान्य दिले आहे. दिवाळीपासून मतदारांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सुरू केली आहे. दिवाळीच्या कार्यक्रमांचा गोडवा अजून संपलेला नाही. प्रभागाची आरक्षण सोडत, प्रारूप मतदारयादी, तसेच प्रभागरचना जाहीर झाली आहे. साधारण मिनी विधानसभा मतदार संघाऐवढा एक प्रभाग झाला आहे. त्यामुळे कमी कालावधीत इच्छुकांनी मोर्चेबांधणी करून मतदारांपर्यंत पोहचावे लागणार आहे. महापालिकेकडून बेकायदा जाहिरातफलक लावण्यास मज्जाव केला जाईल, हे लक्षात घेऊन आताच नववर्षानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ठिकठिकाणी जाहिरातफलक लावण्यावर मोठा खर्च करण्यात आला आहे. रिक्षांवर लक्ष्य २०१७ असे लिहून स्वत:ची छबी अनेकांनी झळकावली आहे. अशा पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांनी कंबर कसली आहे. (प्रतिनिधी)
इच्छुकांकडून कोट्यवधींचा चुराडा
By admin | Published: January 03, 2017 6:27 AM