(पिंपरी चिंचवड) : तळवडे येथील रुपीनगरच्या पश्चिम दिशेला असलेल्या मोकळ्या मैदानात देहुरोड कॅन्टाॅन्मेंट बोर्डाचा कचरा डेपो आहे. आग लागल्यामुळे या कचरा डेपोतुन निघणारे धुराचे लोट रुपीनगर परिसरात येत असल्याचे नागरिकांनी पाहिले.धुरामुळे परिसरातील हवा प्रदुषित झाल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
देहुरोड परिसरातील कचरा रुपीनगर येथे पश्चिम दिशेला असलेल्या कचरा डेपोमध्ये मोकळ्या मैदानात टाकला जातो. या कचऱ्याला शुक्रवारी (दि.३१) रोजी सकाळी लागली असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. अाग विझवण्यासाठी तातडीने अग्निशामक विभागाचा बंब व कर्मचारी दाखल होतील अशी नागरिकांची अपेक्षा असताना, दुपारी १२ वा. सुमारास देहुरोड कॅन्टोमेंट बोर्डाचे आरोग्य विभागाचे कर्मचारी एक जेसीबी मशिन व दोन पाण्याच्या टँकर सह दाखल झाले होते, कर्मचारी टँकरमधील पाणी प्रेरशरच्या सहाय्याने पेटलेल्या कचऱ्यावर मारून आग विझवण्याचे प्रयत्न करत असुन कचऱ्याची आग लवकर विझण्याची शक्यता फारच कमी आहे.
आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत मात्र कचऱ्याच्या आगितुन निघणारे धुराचे लोट पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यासोबत रुपीनगर परिसरात पसरत आहेत. रुपीनगर परिसरात घराचा दरवाजा उघडा ठेवला तर घरात धुर येतो संपूर्ण घर धुराने भरल्यामुळे गुदमरल्यासारखे होते, डोळ्यांची जळजळ होत असल्याने नागरिकांना घरात बसवत नाही, लहान मुले, वृद्ध तसे महिला दिवसभर घरी असल्यामुळे याचा मोठा त्रास सहन करावा लगत आहे.
रुपीनगर येथील नागरिक, लोकप्रतिनिधी यांचा देहुरोड परिसरातील कचरा माळरानावर टाकण्यास विरोध आहे, या परिसरात कोणतीही प्रक्रिया न करता कचरा टाकला जातो. कचऱ्यामध्ये शिळे अन्नपदार्थ, भाजी मंडईतील कचरा, घरगुती कचरा, प्लास्टिक कागद आणि इतर टाकाऊ पदार्थांचा समावेश असतो, या कचऱ्यातून निघणारी दुर्गंधी वाऱ्याबरोबर रुपीनगर परिसरात पसरत असल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच बऱ्याच वेळा कचऱ्याला आग लागल्यामुळे धुराचा त्रासही रहिवाशांना होत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्येपासून सुटका व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी, नागरिक यांनी कॅन्टाॅन्मेंट बोर्डाला निवेदने दिली आहेत, मात्र देहुरोड कँन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रतिसाद दिला जात नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.