पिंपरी : बेकायदेशीरपणे गुटखा विक्री केल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाने चिंचवड आणि भोसरी परिसरात दोन ठिकाणी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.
दळवीनगर झोपडपट्टी येथील मोगा प्रोव्हिजन स्टोअर्स या दुकानात कारवाई करण्यात आली. त्यामध्ये पोलिसांनी अचलाराम डुंगाराम चौधरी (वय ४२, रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड), जवानजी देवासी या दोघांना अटक केली. याबाबत महिला पोलीस सोनाली माने यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपींनी शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटखा विक्री करण्यासाठी दुकानात ठेवले होते. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.सामाजिक सुरक्षा पथकाने दुसरी कारवाई भोसरी आळंदी रोडवर असलेल्या ओम साई पान स्टॉल या टपरीवर केली. त्यात पोलिसांनी कोमल एकनाथ पाटील या महिलेला अटक केली. तिच्यासह गोपाळ एकनाथ पाटील, सुरज संजय पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी महिला पोलीस नाईक संगीता जाधव यांनी फिर्याद दिली. आरोपी कोमल पाटील हिची भोसरी आळंदी रोडवर पानटपरी आहे. त्यामध्ये तिने शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री करण्यासाठी ठेवला होता. तर हा गुटखा आरोपी गोपाल पाटील आणि सुरज पाटील यांनी पुरवला होता. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे