रहाटणी : निवडणूक म्हटले की, गावकी-भावकी यात मोठे राजकारण होते. गाववाला-बाहेरवाला अशी समीकरणेही होतात. मात्र या सर्वच बाबींना फाटा देत रहाटणी-पिंपळे सौदागरमधील उच्चभू्र सोसायटीमधील नागरिकांनी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने येथील राजकीय गणिते बदलू शकतात, अशी चर्चा आहे. सोसायटीधारकांनी वेगळा पॅनल करून त्याच पॅनलला मतदान करायचे ठरविल्यास या ठिकाणच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळू शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.काही सोसायटींमधील नागरिक काही राजकीय पक्षांकडून इच्छुक आहेत. मात्र गावकी-भावकीच्या राजकारणात आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने सर्वच सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून उच्चशिक्षित असे ११ महिला व पुरुष निवडणूक लढविण्यासाठी पुढे आले आहेत. जर एखाद्या पक्षाने अधिकृत दोन तिकिटे सोसायटीमधील इच्छुकांना दिली, तर सोसायटीमधील सर्वच इच्छुक त्या दोन उमेदवारास पाठिंबा देणार आहेत. मात्र, जर राजकीय पक्षाने डावलले, तर सोसायटीमध्ये अपक्षांचा पॅनल होणार असल्याची सध्या परिसरात चर्चा रंगत आहे. सध्या रहाटणी-पिंपळे सौदागरमधून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे शिवसेना, काँग्रेसकडूनही इच्छुक आहेत. मात्र, या सर्व इच्छुकांमध्ये सोसायटीमधील इच्छुक बोटावर मोजावे इतपत होते. सध्या सोसायटीमधून ११ जण इच्छुक आहेत. कधीही राजकारणात न पडणारे सोसायटीमधील नागरिक एवढ्या मोठ्या प्रमाणात राजकारणात येण्याचा निर्णय घेतल्याने अनेकजण अवाक् झाले आहेत. सर्वच सोसायट्यांतील नागरिकांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याने सोसायटीधारक गावकी-भावकीच्या राजकारणाला कंटाळलेत अशी चर्चा आहे.(प्रतिनिधी)
गावकीच्या राजकारणात सोसायटीवाले
By admin | Published: January 24, 2017 2:14 AM