पिंपरी : सदनिका विकत देण्याच्या बहाण्याने १६ लाख २६ हजार ९५६ रुपयांचे कर्ज काढण्यास सांगितले. तसेच आधीच विक्री झालेली सदनिका पुन्हा विकून फसवणूक केली. ही घटना मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत देहूगाव येथील द्वारका स्कीममधील प्लॅट क्रमांक ४०५ मध्ये घडली.
याप्रकरणी अमोल शिवाजी गेडेवाड (वय ३८, मुखेड, जि. नांदेड) यांनी शनिवारी (दि. १८) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गिरीश व्यंकट नारलावर (२६, रा. धनकवडी, पुणे), गिरीश धनराज भटेवारा (रा. पिंपळे गुरव), राजेंद्र सुरेश शिळीमकर (४२, रा. नऱ्हे) यांच्यासह होम लोन करून देणाऱ्या लोन कंपनीच्या तत्कालीन मॅनेजरवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित गिरीश याने फिर्यादी अमोल यांची कागदपत्रे घेऊन प्लॅट घेऊन देतो, असे सांगितले. संशयिताने फिर्यादीच्या नावे १६ लाख २६ हजार ९५६ रुपयांचे होम लोन केले. होम लोन कंपनीचे तत्कालीन मॅनेजर आणि संशयित राजेंद्र यांच्या मदतीने मंजूर करून ते स्वत:च्या फायद्यासाठी वापरले. संशयित गिरीश याने द्वारका स्कीममधील सदनिका क्रमांक ४०५ हा आधीच विकला असतानादेखील त्याच सदनिकेचे रजिस्ट्रेशन फिर्यादी अमोल यांच्या नावे करून त्यांना विकला. संशयितांनी होम लोन फिर्यादी यांच्या नावे मंजूर करून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरले, असे फिर्यादीत नमूद आहे.