पिंपरी : बायको माहेरी आहे, स्वयंपाक करायला कोणी नाही, आजारी आई-वडिलांना हॉस्पिटलमध्ये न्यायचे आहे, अशी एक ना अनेक अफलातून कारणे सांगून जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी इ-पास मिळावा म्हणून एक लाखापेक्षा जास्त अर्ज केले. त्यातील तब्बल ६७ हजार अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने मार्चमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले. संचारबंदी होऊन प्रवासावर मर्यादा आली. परिणामी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या नागरिकांची अडचण झाली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना यातून सवलत देण्यात आली. मात्र इतर सामान्य नागरिकांना पोलिसांकडील ई-पास बंधनकारक करण्यात आले. त्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वैद्यकीय तसेच इतर अतिमहत्त्वाच्या कामासाठी कोरोनाची अँटिजन किंवा आरटीपीसीआर या दोन तपासण्या केल्याच्या अहवालासह ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या सायबर सेलकडून ई-पास उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ऑनलाइन अर्जांवर कार्यवाही करून ते मंजरू अथवा नामंजूर केले जात आहेत. यात अर्जदारांनी अतिमहत्त्वाच्या कामांमध्ये अनेक विषय मांडले आहेत. त्याची पडताळणी करून तसेच संबंधित कागदपत्रांची तपासणी करून सायबर सेलकडून ई-पास दिले जात आहेत. दोन शिफ्टमध्ये त्याचे कामकाज सुरू आहे.
सर्वांचीच मेडिकल इमर्जन्सी कशी ?जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी नागरिकांनी सर्वाधिक वैद्यकीय कारणे ऑनलाइन अर्जात नमूद केली आहेत. कुटुंबातील सदस्य आजारी आहेत, मित्राला हॉस्पिटलला दाखल करायचे आहे, औषधे पाहोच करायची आहेत, अशी विविध वैद्यकीय कारणे त्यात आहेत. सर्वांचीच मेडिकल इमर्जन्सी कशी, असा प्रश्न त्यामुळे उद्भवतो.
अत्यावश्यक कारणासाठीच ई-पास देण्यात येत आहेत. आता अनलॉक होत असल्याने शासनाच्या निर्देशानुसार प्रवासाला मुभा आहे. त्यामुळे अर्ज कमी संख्येने येत आहेत. - डॉ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल, पिंपरी-चिंचवड
जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी काहीही.....- मेस बंद आहे- रोजगार गेला आहे- दुकान बंद ठेवावे लागत आहे- मुलांची तब्बेत बरी नाही- नातेवाईकाचे निधन झाले आहे- साखरपुडा, लग्नाला जायचे आहे- स्वयंपाक करायला घरात कोणीही नाही- माहेरी गेलेल्या बायकोला आणायचे आहे- मुलांची ऑनलाइन शाळा सुरू होणार असून त्यांना घ्यायला जायचे आहे
ई-पाससाठी अर्ज – एक लाख दोन हजार ५३२मंजूर अर्ज – ३५ हजारनामंजूर अर्ज – ६७ हजारप्रलंबित अर्ज - ५३२