पिंपरी : पुनावळे येथे महापालिकेचा प्रस्तावित घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प त्वरित रद्द करून तो इतर ठिकाणी हलवण्यात येणार असल्याचे माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पुनावळे येथे कचरा डेपो उभारण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले होते. त्या विरोधात मागील ३ महिन्यापासून पुनावळे येथील रहिवासी आणि ग्रामस्थांनी मोठा विरोध चालवला होता. कचरा डेपो विरोधात निदर्शने, आंदोलने करण्यात आली, तसेच पुनावळे कचरा डेपो बाबत आमदार अश्विनी जगताप यांनी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. त्याबाबत बोलतांना मंत्री उदय सामंत यांनी कचरा डेपो त्वरित रद्द करून लवकरच पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन येईल दिले आहे. मंत्री उदय सामंत म्हणाले, पुनावळे गाव १९९८ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यावेळी १८ गावांचा डी.पी. देखील तयार करण्यात आला आहे. शहरतील लोकसंख्या वाढीनुसार घनकचरा व्यवस्थापनासाठी २६ हेक्टर जागा महापालिकेने देण्याचे ठरवले. त्यापैकी २२.८ हेक्टर जागा ही वनखात्याची होती. बाकी जागा ही खाजगी होती. वनखात्याच्या अटीनुसार वनखात्याला पर्यायी जागा देण्याचे ठरले होते.
मुळशी व चंद्रपूर येथील जागा वनखात्याला पसंत पडली नाही. तसेच पुनावळे येथे मोठ्याप्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. तेथील नागरिकांचा आणि शाळांचा या प्रकल्पाला मोठा विरोध होत आहे. त्यामुळे हा प्रकल्प पुनावळे येथे उभारणे अशक्य आहे. त्यासाठी पर्यायी जागा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले.