पिंपरी : लॉकडाऊन शिथील होताच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत गुन्ह्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आयुक्तालयांतर्गत असलेल्या १५ पोलीस ठाण्याांमध्ये मंगळवारी (दि. ५) १९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये ५१६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे वाहन व जमावबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे नागरिक घरातच थांबून होते. तत्पूर्वी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत घरात थांबणे पसंत केले होते. त्यामुळे शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच २२ मार्च व २ मे रोजी शहरात एकही गुन्हा दाखल झाला नव्हता. लॉकडाऊन असल्याने नागरिकांना घराबाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे नागरिक तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यापर्यंत पोहचू शकत नव्हते. परिणामी गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र लॉकडाऊन शिथील होताच नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. परिणामी तक्रार करण्यासाठी नागरिकांनी पोलीस ठाणे गाठले. त्यामुळे मंगळवारी पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस ठाण्यात १९ गुन्हे दाखल करण्यात आले.
लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस आयुक्तालयांतर्गत मंगळवारी ५१६ गुन्हे दाखल करण्यात आले. भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये वाकडला सर्वाधिक ७७, पिंपरीत ६५ आणि सांगवी पोलीस ठाण्यात ५९ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कलम १८८ नुसार मंगळवारी करण्यात आलेली कारवाईपोलीस ठाणे दाखल गुन्हेभोसरी एमआयडीसी २४भोसरी २९पिंपरी ६५चिंचवड ४६निगडी ५२आळंदी १७चाकण १०दिघी २६म्हाळुंगे चौकी १०सांगवी ५९वाकड ७७हिंजवडी ११देहूरोड ९तळेगाव दाभाडे ८तळेगाव एमआयडीसी १०चिखली ५४रावेत चौकी ७शिरगाव चौकी २एकूण ५१६