पिंपरी : शहरात चौकातील लाकडी व पत्र्याच्या हातगाडी गायब होणार आहे. त्या जागी संपूर्ण स्टेनलेस स्टीलची जागतिक दर्जाची हातगाडी विक्रेत्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने त्यासाठी पुढाकार घेतला असून, ही हातगाडी संपूर्ण सोलरवर चालणारी असेल. नागरिकांना स्वच्छ व निर्भेळ अन्नपदार्थ मिळण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्य शासनाचा अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए) व ‘मिशन सेफ फूड इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पहिल्यांदा पुण्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. स्टेनलेस स्टीलची नवी हातगाडी वजनाने अत्यंत हलकी असणार आहे. या गाडीत आग प्रतिबंधक यंत्रणेच्या दृष्टिकोनातून विशेष काळजी घेण्यात आली आहे. पहिल्यांदाच हातगाडीवर ग्राहकांसाठी हॅन्ड सॅनिटायझरची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. हातगाडीला विशेष बॉल बेअरिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने ही गाडी कोणत्याही भागातून कितीही अंतरावर नेणे सहज शक्य होणार आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळा टाकण्याची व्यवस्था या गाडीतच उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे हातगाडीवर तयार होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न सुटण्यास हातभार लागणार आहे. ही गाडी हातगाडी विक्रेत्यांना कमीत कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हातगाडीत पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र टँकची सुविधा करण्यात आली आहे. त्याद्वारे नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे शक्य होईल. तसेच गाडीत सर्व साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र युनिटची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे फळभाज्या व पालेभाज्या ठेवणे सोपे व सुटसुटीत होणार आहे. हातगाडी चालकास आपले वापरण्यात येणारे कपडेही यात ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा असेल. हातगाडीच्या तीनही बाजूस सर्व्हिस एरिया ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना अन्नपदार्थ खाणे सोपे होणार आहे. रस्त्यावर अन्नपदार्थ खाणाऱ्या नागरिकांना चांगले व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध होणार आहेत. स्टेनलेस स्टीलची हातगाडी लवकर नागरिकांच्या सेवेत आणण्यासाठी एफडीए प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. (प्रतिनिधी)स्टेनलेस स्टीलची हातगाडी प्रायोगिक तत्त्वावर तयार करण्यात आली आहे. ती प्रत्येक हातगाडी चालकास परवडेल अशा किमतीत आगामी काही महिन्यांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या हातगाडीमुळे नागरिकांना निर्भेळ व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध होईल. - शशिकांत केकरे, सहआयुक्त, अन्न व औषध विभाग
अत्याधुनिक सुविधांयुक्त ‘सोलर हातगाडी’
By admin | Published: April 02, 2016 3:35 AM