तळवडे : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात लाडक्या गणरायाला रुपीनगर परिसरात गणेश भक्तांनी निरोप दिला. सालाबादप्रमाणे या वर्षीही सातव्या दिवशी परिसरातील बहुतांशी घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले.रुपीनगर परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही गैरप्रकार न होता खेळीमेळीच्या वातावरणात विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. मिरवणुकीत वाजंत्री, बँजो डीजेच्या तालावर तरुणांनी ताल धरला होता. मिरवणुकीत एकापेक्षा एक वरचढ असणारी ढोलपथके हे प्रमुख आकर्षण होते. ढोल पथकात मुलींचा सहभाग लक्षणिय होता. मनमोहक बाप्पाच्या मूर्ती, आकर्षक विद्युत रोषणाईत न्हाऊन निघालेला परिसर, लक्षवेधी मेघडंबरी आणि सुंदर फुलांनी सजवलेले गणपती बाप्पाचे रथ व पथकांची लयबद्ध व शिस्तबद्ध मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.रुपीनगर परिसरातील पंडित जवाहरलाल नेहरू मित्र मंडळ, श्रीमंत तिरंगा मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, दक्षता मित्र मंडळ, अचानक मित्र मंडळ, दक्षता मित्र मंडळ, क्रांतिज्योत मित्र मंडळ, सिंहगर्जना मित्र मंडळ, सप्तश्रृंगी मित्र मंडळ, आणि सिद्धनाथ मित्र मंडळ आदी मंडळांनी विसर्जन मिरवणूक काढून गणेश विसर्जन केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप आदी पक्षांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी मंडळांसाठी स्वागत कक्षाची उभारणी केली होती. प्रसंगी निगडी पोलीस स्टेशनचे विजयकुमार पळसुले, नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, पौर्णिमा सोनावणे, संगीता ताम्हाणे, शांताराम भालेकर, सुरेश म्हेत्रे, शीतल वर्णेकर, अरुणा भालेकर तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.‘पीके’मध्ये गणरायाचे विसर्जनरहाटणी : पिंपळे सौदागर येथील वै हभप पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या गणेशमूर्तीचे पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिराच्या पवना नदी घाटावर भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयजयकार करीत ढोल ताशांच्या व लेझीमच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली होती. अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून मिरवणुकीत सहभागी झाले होते.
रुपीनगरमध्ये गणरायाला भावपूर्ण निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 12:58 AM