पिंपरी : रेशनवरील काळा बाजार रोखण्यासाठी तसेच धान्य वितरणातील शिधापत्रिकाधारकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी राज्यस्तरावर अवर सचिवांच्या अध्यक्षतेखाली आठ पथके स्थापन केली आहेत. ही पथके लाभार्थ्यांच्या घरी जाऊन किती धान्य मिळते. त्यासाठी किती पैसे मोजावे लागले याची शहानिशा करणार आहेत. हे पथक पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाले.
मात्र, केवळ ‘फ’ परिमंडळ कार्यालयांतर्गत असलेल्या भोसरी येथील एका दुकानाची तपासणी केली. तर ‘अ’ आणि ‘ज’ परिमंडळ कार्यालयांतर्गत असलेल्या दुकानांची तपासणी न करता तसेच शिधापत्रिकाधारकांशीही चर्चा न करताच हे पथक परत फिरले.रेशन दुकानांवरून मिळणाऱ्या धान्याबाबत लाभार्थ्यांच्या अनेक तक्रारी असतात. पॉस मशिनवरील पावत्या दिल्या जात नाही. तसेच धान्यही वेळेवर दिले जात नाही. या तक्रारींची दखल घेत हे पथक विविध ठिकाणी लाभार्थ्यांची माहिती घेत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात हे पथक आल्यास येथील अडीअडचणी त्यांच्यापुढे मांडता येतील, अशी अपेक्षा शिधापत्रिकाधारकांना होती. दरम्यान, हे पथक मागील आठवड्यात पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाले. या वेळी या पथकाने केवळ ‘फ’ परिमंडळ कार्यालयांतर्गत असलेल्या भोसरीतील एका दुकानाला भेट देत लाभार्थ्यांशी चर्चा केली.अवर सचिव हे या पथकाचे प्रमुख असून, कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी / लिपिक, संबंधित तालुक्याचा निरीक्षण अधिकारी/पुरवठा निरीक्षक, नायब तहसीलदार यांचा पथकात समावेश असतो.पथकाची कार्यपद्धतीपथक शिधापत्रिकाधारकांच्या निवासस्थानी भेट घेईल. सुविधा, लाभार्थ्याला प्राप्त धान्याचा दर्जा, धान्याचा दर, किती तारखेला धान्य प्राप्त झाले, रास्तभाव दुकानदार लाभार्थ्याला पावती देतो किंवा नाही याची माहिती घेतली जाईल. यासह पथक लाभार्थ्यांच्या भेटीमध्ये आॅडिओ, व्हिडीओ सुविधांचा वापर करून लाभार्थ्याला लाभ मिळत आहेत किंवा कसे याची खात्री करून घेईल व त्यांचा अहवाल मुख्यालयात आल्यानंतर प्रधान सचिव यांना सादर करणार आहे.तीन परिमंडळांतर्गत चालते कामकाजपिंपरी-चिंचवड शहरात अन्न धान्य वितरण विभागाचे अ, ज व फ अशा तीन परिमंडळांतर्गत कामकाज चालते. ‘अ’ परिमंडळमध्ये चिंचवड विधानसभा मतदार संघ, ‘ज’ मध्ये पिंपरी तर ‘फ’ मध्ये भोसरी विधानसभा मतदार संघ येतो.