पिंपरी :मावळ लोकसभेसाठी महायुतीकडून खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (दि.२२) उमेदवारी अर्ज भरला. या अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी दहावी पास असल्याचा उल्लेख केला आहे. तर २०१४ आणि २०१९ ला दाखल केलेल्या अर्जावर बारणे यांनी दहावी नापास असा उल्लेख केला होता. १९८० साली नापास झालेले श्रीरंग बारणे हे २०२२ ला उत्तीर्ण झाले आहेत.
खासदार श्रीरंग बारणे हे मावळ लोकसभेसाठी तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत. आतापर्यंत त्यांनी दिलेल्या शपथपत्रांमध्ये आठवी पासचा उल्लेख करत होते. मार्च २०२२ ला त्यांनी दहावीची परिक्षा देत त्यांनी मॅट्रीक पास केली. त्यामुळे त्यांच्या नावापुढे तब्बल ४२ वर्षांनी दहावी पासचा शिक्का लागला आहे.
२०२२ ला केली दहावी पूर्ण...
श्रीरंग बारणे यांनी २०१४ आणि २०१९ च्या शपथपत्रात आठवी पास-दहावी नापास असल्याचे लिहून दिले होते. त्यात चिंचवड येथील फत्तेचंद शाळेतून १९८० साली नापास झाल्याचे नमूद केलेले आहे. त्यानंतर तब्बल ४२ वर्षांनी त्यांनी २०२२ साली दहावीची परिक्षा दिली. त्यात ते उत्तीर्ण झाले आहेत.