पिंपरी : लॉकडाऊन नंतर विठुरायाच्या भेटीसाठी आषाढी वारी दोन वर्षांनी यंदा निघाली. वारीसाठी लाखो वारकऱ्यांनी एसटीने प्रवास केला. त्यामुळे यंदा पुणे विभागातील एसटीच्या १३ आगारांमधून तब्बल १ कोटी ४ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. तर, पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर आगारातून ८ लाख ६९१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. वारकऱ्यांमुळे एसटीने चांगली कमाई केली आहे.
वारीसाठी संपूर्ण राज्यातून साडेचार हजार एसटीच्या बस सोडण्याच्या सूचना महामंडळाने केल्या होत्या. त्यानुसार राज्यातील प्रत्येक आगारातून बस सोडण्यात आल्या होत्या. तब्बल दोन वर्षाने आषाढीला विठुरायाचे दर्शन घेता येणार असल्याने अनेक वारकरी भक्तांनी एसटी बसचे ॲडव्हान्स बुकिंग केले होते.
तब्बल अडीच लाख किलोमीटर धावली एसटी
वारी काळात म्हणजे २१ जून ते १३ जुलै याकाळात पंढरपूर मार्गावर पुणे विभागातील आगारातून बस सोडण्यात आला. या बसने ४३ दिवसांत तब्बल अडीच लाख किलोमीटरचा प्रवास केला. स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी), वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड), राजगुरुनगर, नारायणगाव, भोर, शिरुर, बारामती, सासवड, दौंड अशा विविध आगारातून एसटीने वारकऱ्यांसाठी सेवा दिली.
एसटीने घडवली ‘वारी’
वारीकाळात अनेकांना नोकरी, शेतीच्या कामामुळे पालखी सोहळ्यात सहभागी होता येत नाही. असे भक्त, वारकरी आषाढीच्या दिवशी एसटीने पंढरपूर गाठतात. एसटी महामंडळ देखील आषाढीच्या दोन दिवस आधीपासून पंढरपूर साठी जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करत असते. त्यामुळे लाखो भक्तांना विठुरायाचे दर्शन होते.
प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी नेहमीच सज्ज असते. वारीच्या काळात वारकऱ्यांसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. वारकऱ्यांनी एसटीच्या सेवेचा लाभ घेतला. योग्य नियोजनाने एसटीच्या उत्पन्नात भर पडली आहे. - ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, स्वारगेट
वल्लभनगर आगारातील उत्पन्नदिनांक मिळालेले उत्पन्न (रुपयांमध्ये)
८ जुलै ६२ हजार ८९११० जुलै १ लाख ४९ हजार ८९६११ जुलै २ लाख ४१ हजार ३९८१३ जुलै ३१ हजार ९६७