करंजगाव : नाणे मावळात जाण्यासाठी एसटी बस सेवा बंद झाल्याने अनेक गावे, वाड्या वस्त्यांवरील नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे नाईलाजाने खासगी जीपने प्रवास करावा लागतो. नाणे मावळ या भागात जांभवली, थोरण, शिरदे, पाले नामा, उकसान, सोमवडी, भाजगाव, कोळवाडी, गोवित्री, उंबरवाडी, करंजगाव, साबळेवाडी, मोरमारवाडी, कांबरे, कोंडीवडे, नाणे, नवीन उकसान, नानोली, साई, वाऊड, कचरेवाडी, घोणशेत गावे आहेत. कामशेत ते जांभवली अंतर हे २२ किलोमीटर आहे. कामशेत ते मोरमारेवाडी अंतर हे अंदाजे १३ किलोमीटर आहे. कामशेत ते कचरेवाडी अंतर अंदाजे १० ते १२ किलोमीटर आहे. नाणे मावळातील गावांना जाण्यासाठी सरकारी बससेवा नाही. अनेकांच्या स्व:ताच्या जीप आहेत. दुचाकी आहेत. त्यांना त्रास होत नाही. पण, वाहन नसलेल्यांना खासगी जीपमधून प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. नाणे मावळात जाण्यासाठी एखादा अनोळखी माणूस आला असेल तर त्याला सुरुवातीला कामशेत ते साई हा प्रवास खाजगी जीपने करावा लागतो. नंतर साई ते कचरेवाडी अंतर ३ कि मी अंतर पायी प्रवास करावा लागतो. खाजगी जीपची सेवा सर्व सामान्य व्यक्तींना परवडणारी नाही. बसपेक्षा दुप्पट पैसे जीपला द्यावे लागते. शिवाय नियमापेक्षा जास्त प्रवाशी जीपमध्ये बसवले जातात. विद्यार्थी, कामगार, दूध व्यवसायिक आदींची सुमारे दीड वर्षांपासून बस सेवा बंद असल्याने गैरसोय होत आहे. लवकरात लवकर नाणे मावळात एसटी बस सेवा सुरु करावी. अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
एसटी बंदमुळे नाणे मावळात हाल
By admin | Published: December 26, 2016 3:00 AM