पिंपरी : राज्यातील महत्त्वाच्या आगारांपैकी एक असलेल्या पिंपरी-चिंचवड एसटी आगारातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिलेवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेपाठोपाठ दोन दिवसांपूर्वी एसटी चालकाला मारहाण झाल्याच्या घटनाघडली. सुरक्षा व्यवस्था नसल्याने अतिक्रमणे व बेकायदा पार्किंग होत आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांसह प्रवाशांमध्येही असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. वल्लभनगर येथील पिंपरी-चिंचवड एसटी आगारातून राज्याच्या विविध भागात गाड्या जातात. त्यामुळे प्रवाशांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी म्हणून ओळखले जात असून, शहरात कामगारांची संख्या मोठी आहे. राज्याच्या विविध भागातील कामगार शहरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे शहरातून गावी येण्या-जाण्यासाठी एसटीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे वल्लभनगर आगारात नेहमीच वर्दळ असते. दोन दिवसांपूर्वी एसटीचालक व एका मोटारचालकात वाद झाला. एसटी बस उभ्या केल्या जाणाऱ्या ठिकाणी अडथळा ठरेल अशा पद्धतीने मोटार नेत असताना हटकल्याचा राग आल्याने मोटारचालकाने एसटीचालकाला मारहाण केली. याप्रकरणी मोटार चालकाविरोधात संताप व्यक्त करून एसटी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. त्याचप्रमाणे गेल्या दीड महिन्यापूर्वी आगाराच्या परिसरात महिलेवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. परिसरात पोलीस मदत केंद्र आहे. मात्र, अनेकदा येथे कोणीही उपस्थित नसते. या घटनांमुळे आगारातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. (प्रतिनिधी)
एसटीचे आगार असुरक्षित
By admin | Published: February 17, 2017 5:01 AM