पिंपरी : महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद आयोजित आंतरशालेय जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत आकुर्डी येथील सेंट उर्सुला संघाने १४ वर्षांखालील मुले आणि मुलांच्या गटात विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुट मिळविला. १७ वर्षांखालील मुलींमध्ये निगडीचा विद्यानंदभवन स्कूल संघ अजिंक्य ठरला.सेंट उर्सुला हायस्कूल मैदानावर झालेल्या स्पर्धेत ३४ शाळांचे संघ सहभागी झाले होते. उद्घाटन महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त मनोज लोणकर, सेंट उर्सुलाच्या प्राचार्या सिस्टर लीना, मुख्याध्यापिका सिस्टर दिया यांच्या हस्ते झाले. आयोजन सुभाष चिंचोले, सचिन ववले, रोहिणी कदम आदींनी केले. प्रास्ताविक क्रीडा पर्यवेक्षक सुभाष पवार यांनी केले.१४ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात सेंट उर्सुलाने विद्यानंद भवनचा १२-७ असा पराभव केला. त्यांच्या वरुण शुक्ला (९), स्टिव्ह रॅक्यूल (३) यांनी आणि विद्यानंद भवनच्या साहिल वाघमोडे (६), आदित्य सुतार (१) यांनी उल्लेखनीय खेळ केला. १४ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात उर्सुलाने विद्यानंद भवनचाच ८-५ असा पराभव केला. उर्सुलाच्या सारा अरिन ( ४), अलिश बोके (४) यांनी आणि विद्यानंद भवनच्या समीक्षा इंदुलकर (५) यांनी सामन्यात रंगत आणली. १७ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात विद्यानंद भवनने सेंट उर्सुलाचा १२-२ असा दणदणीत पराभव करीत विजेतेपदपटकावले. विद्यानंद भवनकडून शर्वरी सावंत (१२) हिने जबरदस्त खेळ करीत संघास एकहाती विजय मिळवून दिला. सेंट उर्सुलाकडून श्रेयसी दलाला (२) हिची लढत एकाकी ठरली. (प्रतिनिधी)
सेंट उर्सुलाला दुहेरी मुकुट
By admin | Published: September 15, 2016 1:29 AM