कामशेत : मावळात काही महिन्यांवर येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. नानाविध कार्यक्रमांच्या माध्यमातून, तसेच सोशल मीडियाचा मुक्त हस्ताने वापर करून तळागाळातील मतदारबंधूंपर्यंत पोहचण्याची धडपड सध्या सुरू आहे. याचा मतदारराजाही पुरेपूर फायदा घेताना दिसत आहे. मावळातील अनेक महत्त्वाच्या शहरांसह गावांमध्ये इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षनेत्यांच्या भेटीगाठी होत आहेत. गावकी, भावकी, नातेसंबंध आदी नानाविध क्लृप्त्यांचा वापर केला जात आहे. यात समाजोपयोगी कार्यक्रम, देवदर्शन सहली, महिलांसाठी विविध स्पर्धा व बक्षिसांचे होम मिनिस्टर, आधारकार्ड व विविध कागद पात्रांसाठीची शिबिरे आदीचा आधार घेतला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना ‘मोफत’ची पर्वणी मिळत आहे. सध्या साधारण कार्यकर्त्यांचेही वाढदिवस जोरात साजरे केले जात असून, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना खूश केले जात आहे. सध्या मावळातील अनेक गावांच्या जत्रांचा हंगाम सुरू असून, या जत्रांना विविध पक्षांचे पदाधिकारी व इच्छुक आवर्जून हजेरी लावत आहेत. देवाच्या कार्यक्रमालादेणग्या दिल्या जात आहेत. गावकी, भावकी, नातेवाईक, पक्षांचे मेळावे तसेच महिनोन्महिने पक्षांच्या कार्यकारिणीची रिक्त असलेली पदेही भरली जात असून आहेत. कार्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकीची जाणीव करून दिली जात आहे. शासनाच्या नोटबंदीचा येणाऱ्या निवडणुकीवर किती परिणाम झाला आहे हे येणारा काळच सांगणार असून आचारसंहितेच्या आधी जितका खर्च करता येईल तेवढा विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार करीत आहेत. अर्थात नोटबंदीने त्यांचीही मोठी तारांबळ झाल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)
इच्छुकांची संपर्कासाठी धडपड
By admin | Published: December 26, 2016 2:59 AM