लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची फेब्रुवारीअखेर मुदत संपणार आहे. समितीच्या १६ सदस्यांपैकी आठ नगरसेवकांना समितीतून बाहेर पडावे लागणार आहे. सात फेब्रुवारीला ‘ड्रॉ’ काढला जाणार आहे. त्यामुळे कोणत्या नगरसेवकांना समितीतून बाहेर पडावे लागणार आणि कोणाचा समावेश होणार याबाबत महापालिका वर्तुळात उत्सुकता आहे.महापालिका स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. त्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर बाहेर पडतात. ती नावे चिठ्ठी काढून निश्चित केली जातात. फेब्रुवारीच्या सभेत नवीन सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्याअगोदर ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सात फेब्रुवारीला ‘ड्रॉ’ काढण्यात येईल. स्थायी समिती सभापतींच्या अध्यक्षतेखाली होणाºया सभेत आठ सदस्यांच्या नावाची चिठ्ठी काढली जाईल व ते समितीतून बाहेर पडतील.समितीमध्ये अध्यक्षा सीमा सावळे, आशा शेंडगे, लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, प्रा. उत्तम केंदळे, उषा मुंडे, माधुरी कुलकर्णी, हर्षल ढोरे, निर्मला कुटे, कोमल मेवानी (भाजपा), राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, शिवसेनेचे अमित गावडे आणि अपक्षांचे गटनेते कैलास बारणे हे सदस्य आहेत. त्यापैकी आठ जणांची चिठ्ठी निघेल. त्यानंतर महासभेत निवड केली जाणार आहे.आठऐवजी दहा सदस्यांना काढणार बाहेरभाजपाची सत्ता आल्यानंतर सर्वांना संधी देण्याचे धोरण अवलंबिले जाणार आहे. स्थायीत पाच वर्षांत दर वर्षी दहा याप्रमाणे ५० नगरसेवकांना संधी देण्याचे धोरण आहे. त्यामुळे भाजपाकडून विद्यमान दहा सदस्यांना राजीनामा द्यायला लावून नवीन दहा सदस्यांना संधी दिली जाऊ शकते.नेत्यांचे उंबरे झिजविताहेत नगरसेवकसमितीत भाजपा दहा, राष्ट्रवादी काँग्रेस चार, शिवसेना एक आणि अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. दरम्यान, आपली वर्णी लागावी, यासाठी आत्तापासूनच नगरसेवकांनी वरिष्ठांचे उंबरे झिजविण्यास सुरुवात केली आहेत. तसेच आमदार लक्ष्मण जगतापसमर्थक सीमा सावळे यांना सभापतिपदी संधी दिली होती. आता खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, जुन्या-नव्या गटापैकी कोणास संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे.
स्थायी समिती सदस्यपदासाठी चुरस? सात फेब्रुवारीला सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 2:59 AM