पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समिती सभेत पाणी प्रश्नावरून वादळी चर्चा झाली. चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील सदस्यांनी निष्क्रिय प्रशासनामुळे पाणीटंचाई होत आहे, पाणीटंचाईला प्रशासनच जबाबदार असल्याचे जाहीरपणे सांगितले. आयुक्तांचा प्रशासनावर वचक नाही आणि सत्ताधारी म्हणून आम्ही आयुक्तांवर वचक निर्माण करण्यात कमी पडत आहोत. आयुक्त मलई मिळणारी कामे करण्यात दंग आहेत. त्यांना जनतेच्या हिताच्या कामाचे काही देणेघेणे नाही, असे सांगून सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी हतबलता प्रकट करून सभात्याग केला.
महापालिकेच्या स्थायी समितीची तहकूब साप्ताहिक सभा आज झाली. स्थायी समितीत पाणी प्रश्न पेटला होता. सुरुवातीला चिंचवड विधानसभा मतदार संघातील नगरसेवक सागर आंगोळकर यांनी पाणीटंचाईवर प्रकाश टाकला. भोसरी विधानसभेतील नगरसेवक विकास डोळस हेही आक्रमक झाले. आंगोळकर म्हणाले, ‘‘विस्कळीत पाणीपुरवठा, विकास कामे केली जात नाही. सत्ताधारी पक्षात असूनही कामे होत नाहीत. पाणीपुरवठ्यावर आवाज उठविल्यास केवळ चार दिवस पाणी सुरळीत होते. चार दिवसांनंतर जैसे थे परिस्थिती असते. आमदार वास्तव्यास आहेत, त्याच परिसरात पाणीपुरवठा होत नसेल तर पिंपळे गुरव परिसरात पाण्याची मोठी टंचाई आहे.’’डोळस म्हणाले, ‘‘दिघी-बोपखेल परिसरात नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. चार दिवस पाणी येते, तर चार दिवस पाणी येत नाही. त्यामुळे दिघी, बोपखेलकर हैराण झाले आहेत. निवडून आल्यापासून पाणीपुरवठ्याबाबत सातत्याने आवाज उठवित आहे. तरीदेखील प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. केवळ पाण्याचे नियोजन केले जात असल्याचे सांगितले जाते. परंतु, प्रत्यक्षात कारवाई शून्य आहे.’’प्रशासन मलईदार कामांत व्यस्तसत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांची कामे होत नसल्याबद्दल भाजपा सदस्य डोळस यांनी आयुक्तांवर टीका केली. ते म्हणाले, ‘‘प्रशासन मलईदार कामे करण्यात दंग आहे. त्यांना जनतेशी निगडित कामाचे काही देणे घेणे राहिले नाही. आयुक्तांचा प्रशासनावर कसलाही वचक नाही. सत्ताधारी म्हणून आम्ही त्यांच्यावर वचक निर्माण करण्यात कमी पडत आहोत. आयुक्तांच्या निष्क्रियतेमुळेच शहरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास अधिकाºयांना घरी बसविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.’’ डोळस आणि आंगोळकर यांनी प्रशासनावर टीका करून सभात्याग केला.