पिंपरी : महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी स्थायी समितीने शनिवारी घेतलेल्या विशेष सभेत जोरदार बॅटिंग केली. काही मिनिटांतच १०५ कोटीं रुपये खर्चाच्या कामांना मंजुरी देण्यात आली. आकुर्डी रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यासाठी येणाऱ्या ३८ कोटींच्या खर्चाचाही यामध्ये समावेश आहे. सभेच्या अध्येक्षस्थानी डब्बू आसवानी होते. शनिवारी घेण्यात आलेल्या सभेच्या विषयपत्रिकेवर २९ विषय होते. हे सर्वच विषय मोठ्या खर्चाचे होते. या कोट्यवधींच्या विषयांना स्थायीने काही मिनिटांतच मंजुरी दिली. प्रभाग ३९ मधील आरक्षण क्रमांक ५३ मध्ये व्यापारी संकुल विकसित करण्यासाठी १९ कोटी ८७ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. यासह प्रभाग क्रमांक ५८ मधील आदर्शनगर, संत तुकारामनगर भागातील रस्ते मॉडेल वॉर्ड पद्धतीने विकसित करणे ४ कोटी ५१ लाख तसेच शहरातील विविध भागांमध्ये सिमेंट-काँक्रीटचे रस्ते तयार करण्यासाठी ६ कोटी ४४ लाख ४६ हजार रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. (प्रतिनिधी)- प्रभाग ४४ मध्ये कॉक्रीट रस्ते करण्यासाठी ६ कोटी ५४ लाख, सांगवी-किवळे रस्ता कावेरीनगर येथे सबवे बांधण्यासाठी ५ कोटी ५३ लाख, प्रभाग ६० सांगवीमध्ये विकासकामांसाठी २ कोटी ५१ लाख, डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात भीमसृष्टी, लँडस्केपिंग कामे व मुख्य प्रवेशद्वार कमानीसाठी १ कोटी ४४ लाख मंजूर करण्यात आले.
स्थायी समितीची १०५ कोटींची बॅटिंग
By admin | Published: January 08, 2017 3:28 AM