चिंचवड : छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनेक उमेदवार आता काही प्रमाणात का होईना, निश्चिंत झाले आहेत. निवडणुकीसाठी थोडेच दिवस शिल्लक राहिल्याने अधिकृत उमेदवारी मिळालेले उमेदवार प्रचाराला लागले आहेत. चिंचवड मधील सर्वच भागात प्रचारफेरऱ्या निघत असल्याने निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.राजकीय पक्षात होणारी बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी अधिकृत उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया गुलदस्त्यात ठेवली होती. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एबी फॉर्म राखून ठेवण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांमधे अस्वस्थता होती. यामुळे अनेकजण प्रचारासाठी सक्रीय झाले नव्हते. यंदाची निवडणूक चार सदस्यीय पद्धतीने होत असल्याने आपल्याबरोबर पक्षाचे इतर उमेदवार कोण असतील, हे स्पष्ट होत नव्हते. मात्र, आता अधिकृत उमेदवारांची यादी स्पष्ट झाल्याने प्रचारासाठी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.प्रभाग क्रमांक १७,१८ व १९ मधे चिंचवडचा भाग समाविष्ट करण्यात आला आहे. यातील प्रभाग १९ मधे चिंचवड स्टेशनमधील व पिंपरीतील काही भाग जोडण्यात आल्याने प्रचारासाठी उमेदवारांची धावपळ होणार आहे. या प्रभागात लोकवस्ती असल्याने प्रचार यंत्रणा राबविण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे.(वार्ताहर)
चिंचवडमध्ये रणधुमाळी सुरू
By admin | Published: February 06, 2017 6:09 AM