पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरात डेंगी, स्वाइन फ्लू, मलेरिया या साथीच्या आजारांचा विळखा पडला आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या विषयीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच आरोग्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दखल घेतली आहे.या प्रकरणाची चौकशी करावी आणि उपाययोजना करावी, असे निर्देश महापालिका प्रशासनास दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लोकसंख्या २२ लाखांवर पोहोचली आहे. महापालिकेतील आरोग्य आणि वैद्यकीय विभागाच्या अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे शहराचे आरोग्य बिघडले आहे. जानेवारी ते आॅक्टोबरपर्यंत १० महिन्यांच्या कालावधीत थंडी, ताप, डेंगी, स्वाइन फ्लू, मलेरियाच्या रुग्णांत वाढ झाली आहे.डेंगीचे तब्बल ३१६, तर चिकुनगुनियाचे ५४ रुग्ण आढळल्याची माहिती महापालिकेकडे आहे. खासगी व शासकीय अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांत डेंगीचे रुग्ण उपचारास असल्याने पालिकेकडे या संदर्भातील ठोस आकडेवारी उपलब्ध नाही. जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत डेंगीचे दोन हजार ६०० संशयित, तर ३१६ सदोष रुग्ण आढळले आहेत. हिवतापाचे ३७ सदोष रुग्ण आढळले आहेत. चिकुनगुनियाचे ५४ संशयित रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूने गेल्या दहा महिन्यांत ५८ बळी गेले आहेत.गेल्या काही वर्षांतील ही बळींची सर्वाधिक संख्या आहे. गेल्या दहा महिन्यांत ५८ जणांचा बळी गेला आहे. साथीचे आजार रोखण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. नगरसदस्यांच्या सहकार्याने आणि सार्वजनिक मंडळांच्या मदतीने जनजागृती होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. या विषयी डॉ. पाटील म्हणाले, ‘‘नागरिकांचे आरोग्य हे प्रथम कर्तव्य आहे. लोकमतने पिंपरी-चिंचवडमधील आरोग्याचा प्रश्न मांडल्यानंंतर आयुक्तांशी या संदर्भात चर्चा केली आहे. तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.’’> संवेदनशीलताया विषयीचे वृत्त लोकमतच्या हॅलो पिंपरी-चिंचवडमध्ये प्रकाशित होताच आरोग्य राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पिंपरी-चिंचवडमधील आरोग्याचा प्रश्न गांभर्याने घेतला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी संवाद साधून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना केल्या आहेत. आरोग्याविषयीची संवेदनशीलता आरोग्यमंत्र्यांनी दाखविली आहे.
उद्योगनगरीतील आरोग्याचा राज्य सरकारकडून पंचनामा, नगरविकास मंत्र्यांकडून दखल; उपाययोजना करण्याचा महापालिका आयुक्तांना आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 1:31 AM