पिंपरी : शहरातील झोपडट्टीमधील दिशा भरकटलेली मुले ‘स्लम साॅकर’ खेळणार आहेत. नागपूर येथे गुरुवारपासून (दि. ३१) ही राज्यस्तरीय फुटबाॅल स्पर्धा होणार आहे. त्यात सहभागी होणाऱ्या शहरातील फुटबाॅलपटू मंगळवारी (दि. २९) रवाना झाले.
पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या क्रीडा उपक्रमांतर्गत झोपडपट्टी भागातील १० मुलांची या स्पर्धेसाठी निवड झाली. या फुटबाॅलपटूंना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात शुभेच्छा देण्यात आल्या. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त डाॅ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त डॉ. सागर कवडे, संदेश स्पोर्ट फाउंडेशचे संदेश बोर्डे, ऋषिकेश तपशाळकर उपस्थित होते.
विविध गुन्ह्यांत अल्पवयीन (विधीसंघर्षित) मुलांचे प्रमाण जास्त आहे. त्यांना समुपदेशन व मार्गदर्शन न केल्यास ते कायमस्वरूपी गुन्हेगार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने पोलिसांचे विशेष बाल पथक क्रीडा उपक्रम राबवित आहे. संदेश स्पोर्ट फाऊंडेशनच्या माध्यमातून या मुलांना फुटबाॅलचे प्रशिक्षण सुरू आहे. नागपूर येथे फुटबॉल स्पर्धेसाठी ते रवाना झाले. पोलीस अंमलदार संपत निकम, कपिलेश इगवे, दीपाली शिर्के यांनी संयोजन केले.
कृष्ण प्रकाश म्हणाले, खेळामध्ये हार व जीत होतच असते. या स्पर्धेसाठी निवड झाली हाच या मुलांचा मोठा विजय आहे. खेळाडुंची ही पिढी नवीन दिशा देणारी आहे. झोपडपट्टी भागातील दिशा भरकटलेल्या मुलांसाठी हे खेळाडू आदर्श बनतील. आपण खेळ जिंकण्यापेक्षा तो खेळ किती प्रामाणिक होऊन खेळलो यातूनच आपल्याला समाधान मिळते.