पिंपरी : हॉटेलमध्ये दारूच्या बाटल्या चोरून घेऊन जात असताना वेटरने विरोध केला. त्यामुळे तरुणाने वेटरवर चाकूने वार केले. यात तो जखमी झाला. देहूगाव येथील एम. एस. हॉटेलमध्ये शनिवारी (दि. २७) पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
इंद्रजीत बालाजी डुकरे (२९, रा. देहूगाव) असे जखमी वेटरचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सोनू उर्फ आशितोष दिगंबर एकलारे (२२, रा. देहूगाव) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इंद्रजीत आणि सोनू हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सोनू याने इंद्रजीत काम करत असलेल्या हॉटेलमधून देशी-विदेशी दारूच्या बाटल्या चोरल्या. हा प्रकार इंद्रजीत याने पाहिला. त्याने सोनू याला चोरलेल्या दारूच्या बाटल्या बाहेर घेऊन जाण्यास विरोध केला. या कारणावरून सोनू याने इंद्रजीत याच्यावर हॉटेलमधील चाकूने सपासप वार केले. यामध्ये इंद्रजीत याच्या गळ्यावर आणि गालावर गंभीर जखमा झाल्या.