पिंपरी : माैजमजेसाठी चोरलेल्या दुचाकींची केवळ पाच ते १० हजारांत विक्री केली. याप्रकरणी सराईतास हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १५ दुचाकी जप्त केल्या. असिफ शेरखान पठाण (वय २१, रा.मुळशी, मुळ रा. मोहोळ, सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा शोध हिंजवडी पोलीस घेत असताना त्यांना रामनगर, बावधन परिसरात एक इसम संशयीतरित्या फिरताना दिसला. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने परिसरात वाहनचोरीसाठी आल्याचे सांगितले. त्याला अटक करून पोलिसांनी तपास केला.
यामध्ये त्याच्यावरील हिंजवडी पोलीस ठाणे येथील २, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील २, सिंहगड पोलीस ठाण्यातील २, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील २, वारजे पोलीस ठाण्यातील २ तर दत्तवाडी कोथरूड, चंदननगर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे १३ गुन्हे उघड झाले आहेत. तर दोन दुचाकीची कोणतीही तक्रार अद्याप पोलिसांकडे नाही. असा एकूण चार लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर पठाणचे दोन साथीदार नितीन पांढुरंग साबळे व अनिकेत अमर ढगे हे फरार असून यातील ढगे याच्यावर २०१७ मध्ये मोका अंतर्गत बिबेवाडी पोलिसांनी कारवाईकेली होती.
वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, रामग गोमारे, सहायक उपनिरीक्षक बंडू मारणे, नितीन साळुंके, बाळकृष्ण शिंदे, पोलीस कर्मचारी आबा सावंत, बापू धुमाळ, कैलास केंगले, विक्रम कुदळ, योगेश शिंदे, रितेश कोळी, अरुण नरळे, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, अमर राणे, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कागदपत्र नंतर देतो म्हणून गाड्यांची विक्रीचोरी केलेली वाहने आरोपींनी ग्रामीण भागात विक्री केली. २० ते ३० हजार रुपये किंमत सांगून पाच ते १० हजार रुपये घेऊन कागदपत्रे नंतर देतो, असे सांगून आरोपी वाहनांची विक्री करीत होते. इतक्या कमी किमतीत गाडी मिळत असल्याने ग्राहक गाड्या खरेदी करीत. या पैशांतून आरोपी मौजमजा करीत होते.