पिंपरी : विक्रीसाठी आणलेल्या चोरीच्या मुद्देमालासह १५ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकाला नाशिक फाटा येथून ताब्यात घेतले. घरफोडी व वाहन चोरीचे त्याने नऊ गुन्हे दाखल केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्याकडून सात लाख ६८ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ही कारवाई केली.
याप्रकरणी विधीसंघर्षग्रस्त बालकासह त्याचे साथीदार असलेले किरण गुरुनाथ राठोड, शेखर संभाजी जाधव, विकी कमल मांझी (सर्व रा. भोसरी), कृष्णा उर्फ बाॅबी संजय तांगतोडे (रा. नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी हे रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.
एक सराईत गुन्हेगार नाशिक फाटा येथे चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावूून विधीसंघर्षग्रस्त बालकाला चोरीच्या मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्याचा साथीदार आरोपी राठोड तेथून पळून गेला. विधीसंघर्षग्रस्त बालकाने त्याचे साथीदार आरोपी राठोड, जाधव, मांझी व तांगतोडे यांच्यासह घरफोडी व वाहनचोरीचे नऊ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यातील चार गुन्हे भोसरी पोलीस ठाणे तर पाच गुन्हे निगडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून चोरीचे ६६ ग्रॅम सोन्याचे, २८ ग्रॅम चांदीचे दागिने, चार एलसीडी टीव्ही, तीन दुचाकी, एक लॅपटाॅप, एक टॅब, एक मोबाईल फोन, चार मनगटी घड्याळे, गॅस सिलेंडर व शेगडी, असा एकूण सात लाख ६८ हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी जाधव याच्यावर २३, मांझी याच्यावर १८, तर तांगतोडे याच्यावर १९ गुन्हे दाखल असून, ते सध्या येरवडा कारागृहात आहेत. तसेच आरोपी राठोड याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत.
युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहायक निरीक्षक अंबरिष देशमुख, सहायक पोलीस उपनिरीक्षक धर्मराज आवटे, पोलीस कर्मचारी प्रवीण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, दादाभाऊ पवार, अदिनाथ मिसाळ, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मो. गाैस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिद्ध पांढरे, प्रशांत सैद, सुनील गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, धनाजी शिंदे, आजिनाथ ओंबासे, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, नागेश माळी, राजेंद्र शेटे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.