पिंपरी: पर्यावरणाचे रक्षण हे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. झाडांपासूनच आपल्याला आरोग्यविषयक आणि उपयोगी गोष्टी मिळतात. पर्यावरणावर घात करत लालसेपोटी माणूसच झाडांची विक्री करू लागला आहे. पिंपरीत खासगी मालकीच्या क्षेत्रात अतिक्रमण करून २५ लाख रुपये किमतीची झाडे तोडून विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वाल्हेकरवाडी येथे २० मार्च २०२१ रोजी हा प्रकार उघडकीस आला.
नितीन दत्तात्रय चिंचवडे ( वय ५८, रा. कोथरूड, पुणे) यांनी या प्रकरणी मंगळवारी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजय विठ्ठल चिंचवडे व शरद विठ्ठल चिंचवडे (दोघेही रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादीच्या मालकीच्या क्षेत्रात (मिळकतीमध्ये) अतिक्रमण करून त्यातील २५ लाख रुपये किमतीची आंबा, फणस, चिकू, बाभूळ व इतर छोटी मोठी झाडे विनापरवाना तोडून त्यांची चोरी करून विक्री केली. चिंचवड पोलिस तपास करत आहेत.