Corona virus : कोरोनाबाधितांवर उपचार करताना रेमडेसिविरचा अवाजवी वापर थांबवा : डॉ. अमोल कोल्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 10:10 PM2021-04-30T22:10:09+5:302021-04-30T22:12:46+5:30
आरोग्य रक्षणाची जबाबदारी आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि सरकार यांची जेवढी आहे तेवढीच जबाबदारी प्रत्येकाची देखील आहे....
पिंपरी: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढीचा आलेख गेल्या काही दिवसांपासून स्थिरावला आहे ही दिलासादायक गोष्ट आहे. मात्र तरीदेखील कोणीही गाफील न राहता कोरोना संबंधित नियमांचे काटेकोर पालन करुन स्वत:सह कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, कोरोना बाधितांवर उपचार करताना रेमडेसिविरचा अवाजवी वापर थांबवणे गरजेचे आहे, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या पिंपरी येथील जम्बो कोविड सेंटरला तसेच ऑटो क्लस्टर, चिंचवड येथील कोविड रुग्णालयाला खासदार डॉ. कोल्हे यांनी भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा आणि माहिती घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त राजेश पाटील, माजी महापौर योगेश बहल, संजोग वाघेरे, पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, सहाय्यक आयुक्त सुनिल अलमलेकर, बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी, जम्बो कोवीड रुग्णालयाचे समन्वयक डॉ. सुनिल पवार, व्यवस्थापक डॉ. संग्राम कपाले, प्रिती व्हिक्टर आदी उपस्थित होते.
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, ‘‘कोविड सदृश लक्षणे दिसत असतील अथवा बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यास तात्काळ कोरोनाची चाचणी करुन निदान करणे गरजेचे आहे.त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केल्यानंतर कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. आरोग्य रक्षणाची जबाबदारी आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि सरकार यांची जेवढी आहे तेवढीच जबाबदारी प्रत्येकाची देखील आहे. कोरोना बाधितांवर उपचार करताना रेमडेसिविरचा अवाजवी वापर थांबवणे गरजेचे आहे.ज्या रुग्णांना त्याची आवश्यकता आहे अशा योग्य रुग्णांना रेमडेसिविर दिले पाहिजे.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत रेमडेसीवीरची वितरण प्रणाली योग्य पध्दतीने कार्यरत आहे. रेमडेसिविर कशा पध्दतीने उपलब्ध होते याची माहिती करुन दिल्यास नागरिकांची धावपळ होणार नाही. महापालिकेने येथील व्यवस्थापनाचे उत्तम पध्दतीने नियोजन केले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचे समूपदेशन करुन त्यांना दिलासा देण्याचे काम देखील महापालिका करीत आहे.’’