देहूरोड : देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावरील किवळे ते शितळानगर दरम्यानच्या सेवा रस्त्याचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले काम सुरू करण्याच्या मागणीसाठी फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच व स्थानिक नागरिकांनी गुरुवारी दुपारी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. विकासनगर येथील दुभाजकातील रस्ता बंद केल्याने गहुंजे, विकासनगर, उत्तमनगर, किवळे भागातील विद्यार्थी, नागरिकांना पर्यायी व्यवस्था नसल्याने दोन-अडीच किलोमीटरचा वळसा घालावा लागत असल्याने मोठी गैरसोय, वेळेचा व पैशाचा अपव्यय होऊ लागला आहे. पर्यायी रस्त्यावर देखील उलट दिशेनेच वाहने न्यावी लागत असल्याने त्या ठिकाणीही अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. शितळानगर (मामुर्डी) येथील भुयारी मार्गाचे बांधकाम रखडले आहे. नागरिकांना पर्यायी रस्ता उपलब्ध करण्यात आलेला नाही. विकासनगर ते शितळानगर (मामुर्डी) दरम्यानची सेवा रस्त्याचे काम रखडलेले आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मंचाचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी बोर्डाचे सदस्य गोपाळराव तंतरपाळे, महेश गायकवाड, पंकज तंतरपाळे, तसेच मंचाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. आंदोलकांनी काही काळ वाहतूक रोखून धरली. आंदोलनाच्या वेळी पोलीस पोहोचण्यास उशीर झाल्याने वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. (वार्ताहर) अधिकाऱ्यांनी घेतली आंदोलकांची भेटसहायक पोलीस निरीक्षक ज्योती पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अर्ध्या तासात आंदोलनाच्या ठिकाणी येत असल्याची माहिती दिल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार रास्ता रोको आंदोलन थांबविण्यात आले. प्राधिकरणाचे तांत्रिक व्यवस्थापक मिलिंद वाबळे, तसेच देहूरोड ते सातारा सहा पदरीकरण करणाऱ्या संबंधित ठेकेदाराचे प्रतिनिधी यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी आंदोलकांची भेट घेतली. वाबळे यांनी येत्या सोमवारी सेवा रस्त्याचे काम सुरु करण्यात येईल, पोलिसांकडून पुलाखालून होणारी वाहतूक इतरत्र वळविण्याची परवानगी मिळाल्यानंतर पुलाचे काम सुरु करण्यात येणार आहे . तसेच किवळे येथील भुयारी मार्ग व पादचारी उड्डाणपूल यांचा एका महिन्यात वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले .
रस्त्यासाठी रास्ता रोको
By admin | Published: May 05, 2017 2:42 AM