लोणावळा : मराठा आरक्षणाच्या मागणी करता सकल मराठा समाजाच्या वतीने क्रांतीदिनी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात सर्व व्यवहार बंद ठेवत रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले. ९ आॅगस्ट रोजी होणारे आंदोलन हे अहिंसा व शांततेच्या मार्गाने करण्याकरिता नुकतीच नियोजन बैठक लोणावळ्यात पार पडली. या बैठकीत पुणे ग्रामीणचे नुतन पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी देखील मराठा समाजाला मार्गदर्शन करत आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन केले. सकल मराठा समाज लोणावळा शहर व ग्रामीण हे गुरुवारी (९ आॅगस्ट) या क्रांतीदिनी सकाळी ९ वाजता भाजीमार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित जमणार आहेत. त्याठिकाणी पाच कुमारिका छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चाला सुरुवात होईल. भाजी मार्केट ते गवळीवाडा नाका, तेथून रेल्वे स्थानक असा मार्ग असेल. रेल्वे स्थानकावर काही काळ घोषणाबाजी व रेल्वे रोको करण्यात येणार आहे.सायंकाळी पाच वाजता राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता होणार आहे. ...............................कुणेनामा ग्रामपंचायतीचा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा आदिवासी बहुल ग्रामपंचायत असलेल्या कुणेनामा ग्रामपंचायतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी पूर्ण पाठिंबा दिला असून अशी निवेदने जिल्हाधिकारी, प्रांत, तहसिलदार या सर्व शासकीय कार्यालयांना दिली आहे. याबाबत बोलताना ग्रामपंचायत सदस्य रामदास पांडवे म्हणाले, कुणेनामा ग्रामपंचायत ही ७० टक्के आदिवासी बहुल असली तरी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्याय मागणीला आमचा पाठिंबा आहे.
लोणावळ्यात ९ आॅगस्टला रेल्वे रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 6:50 PM
क्रांतीदिनी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात सर्व व्यवहार बंद ठेवत रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देआदिवासी बहुल कुणेनामा ग्रामपंचायतीचा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा