पिंपरी : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या राज्यव्यापी जेल भरो आंदोलनास पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. अंगणवाडी कर्मचारी सभेचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात पाच ठिकाणी आंदोलन झाले. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक फाटा, कासारवाडी येथे रास्ता रोको करण्यात आले. शैलजा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात २५० अंगणवाडीसेविकांना भोसरी पोलिसांनी अटक करून नंतर सोडून दिले.राज्यव्यापी जेल भरो आंदोलनास प्रतिसाद म्हणून सकाळी ११.४०ला पिंपरी-चिंचवडच्या विविध भागातील अंगणवाडीसेविका नाशिक फाटा, कासारवाडी येथे जमा झाल्या. ‘मानधन नको दयेचे, वेतन हवे हक्काचे’, ‘भाऊबीज नको, बोनस हवा’, ‘निकृष्ट टीएचआर रद्द करा, उत्कृष्ट शिजवलेला आहार पुरवा’, ‘अंगणवाडीचे भाडे वेळेवर द्या’ आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.रस्ता रोको आंदोलनावेळी भोसरी पोलिसांनी आंदोलक अंगणवाडी सेविकांना ताब्यात घेतले. शैलजा चौधरी, सुनंदा साळवे, सिंधू मोरे, शेहनाज शेख, अश्विनी पवार, वैशाली जगताप, कमाल सुर्वे यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला.
अंगणवाडीसेविकांचा रास्ता रोको, जेल भरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 6:46 AM