प्रकाश गायकर
पिंपरी : २००९ मध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघ तयार झाला. त्यावेळच्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून लक्ष्मण जगताप निवडून आले. त्यानंतरच्या सलग तीन निवडणुकांमध्येही चिंचवडवर जगतापांची सत्ता आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये देखील जगताप कुटुंबीयांचा करिश्मा दिसला. २००९ ला जगताप अपक्ष असले तरी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार यांचा छुपा पाठिंबा होता. मात्र, २०१४ ला जगतापांनी भाजपाची वाट धरल्यानंतरही आतापर्यंत जगताप कुटुंबीयांनी चिंचवडवर सत्ता कायम ठेवली आहे. जगताप पॅटर्नला शह देऊन भाजपच्या ताब्यातून चिंचवडचा गड घेण्यासाठी महाविकास आघाडीने एकदिलाने लढणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीत इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने बंडखोरी व गट-तट रोखण्याचे आवाहन राष्ट्रवादीपुढे आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये लोकसभा व विधानसभा पुनर्रचनेनंतर पहिली निवडणूक २००९ मध्ये झाली. त्यावेळी काँग्रेस आघाडीमध्ये श्रीरंग बारणे यांना विधानसभेची अधिकृत उमेदवारी मिळाली. त्यावेळी जगताप यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. यावेळी अजित पवार समर्थक राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्यावर ते निवडून आले. त्यानंतर २०१४ मध्ये लक्ष्मण जगताप यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र, कधीकाळी अजित पवार यांचे विश्वासू असलेल्या जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये चिंचवड विधानसभेवर त्यांनी विजयी मिळवून निर्विवाद वर्चस्व तयार केले.
दरम्यान, ३ जानेवारी २०२३ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप निवडून आल्या. या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. मात्र, महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी होऊन राहुल कलाटे यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यामुळे अजित पवार यांच्या चिंचवडचा गड ताब्यात घेण्याच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग लागला. त्याचवेळी झालेल्या कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये इतिहास घडला. महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकदिलाने लढल्याने काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा विजय झाला. त्यामुळे गेली १४ वर्षे चिंचवडवर सत्ता असलेल्या जगताप पॅटर्नला शह देण्यासाठी कसबा पॅटर्न राबवण्याची रणनीती महाविकास आघाडीला आखावी लागणार आहे. मात्र, पोटनिवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील बंडखोरी रोखण्याचे आव्हान महाविकास आघाडीसमोर असणार आहे.
बंड थंड करणे हेच ‘मविआ’चे आव्हान
महाविकास आघाडीमध्ये चिंचवड मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेससह ठाकरे गटामध्ये देखील इच्छुकांची गर्दी आहे. त्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये आला. शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी महाविकास आघाडीतून उमेदवारी मागितली. परंतु, ही उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढविली. त्याचा फटका महाआघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांना बसला. तर याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, माया बारणे, राजेंद्र जगताप हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तसेच ठाकरे गटाचे ॲड. सचिन भोसले, काँग्रेसचे कैलास कदम व दिलीप पांढरकर देखील इच्छुक आहेत. त्यामुळे ‘कसबा पॅटर्न’ची नीती अवलंबत ‘जगताप पॅटर्न’ला धक्का द्यायचा असेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे बंड थंड करण्यासाठी कस लागणार आहे.
भाजपचा उमेदवार कोण?
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्र लढणार आहे. त्यामध्ये चिंचवड मतदारसंघ भाजपकडेच आहे. सध्या पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेल्या अश्विनी जगताप आमदार आहेत. मात्र, २०२४ साठी त्यांच्याच घरातील त्यांचे दीर शंकर जगताप निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. या दोघांपैकी एक की आणखी नवीन उमेदवार भाजपकडून दिला जाणार, याविषयी उत्सुकता आहे.
असा आहे मतदारसंघ
शहराची विभागणी होऊन २००९ मध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले. त्यात सर्वात मोठा चिंचवड मतदारसंघ असून मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत, वाल्हेकरवाडी, पुनावळे, काळेवाडी, थेरगाव, रहाटणी, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, सांगवी या भागाचा समावेश आहे.
२०२३ पोटनिवडणुकीत मिळालेली मते
१) अश्विनी जगताप (भाजप) - १ लाख ३५ हजार ६०३२) नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) - ९९ हजार ४३५३) राहुल कलाटे (अपक्ष) - ४४ हजार ११२
२०१९ला उमेदवारांना मिळालेली मते
लक्ष्मण जगताप (भाजप) – १ लाख ५० हजार ७२३राहुल कलाटे (अपक्ष) – १ लाख १२ हजार २२५नोटा – ५ हजार ८७४
पोटनिवडणुकीत पक्षानुसार मिळालेली मते
भाजप व शिंदे गट - ४७.२३ टक्केमहाविकास आघाडी - ३४.६३ टक्केराहुल कलाटे (अपक्ष) - १५.३६ टक्के