थेरगाव : गुजरनगर येथील शंकर गुजर पथ या गल्लीमध्ये गेल्या २ दिवसांपासून ड्रेनेज लाईनचे घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे़ त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरली आहे़ येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
रस्त्यातच मैलामिश्रत पाणी वाहत असल्याने पादचाºयांनाही चालताना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनांची दिवसभर वर्दळ चालू असते़वाहनांमुळे हे घाण पाणी रहिवाशांच्या घरात आणि पादचाºयांच्या अंगावर उडत आहे. त्यातच सध्या अवकाळी पाऊस सुरू असल्याने रोगराई पसरण्याची भीती नागरिकांना वाटू लागली आहे. नागरिकांना या घाण पाण्यामुळे मोकळा श्वास घेणे आणि घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे.शहरात सध्या डेंगी, मलेरिया यांसारख्या आजारांनी थैमान घातले आहे. असे असतानाही आरोग्य विभाग नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे येथील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. दिवसेंदिवस नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. तरी आरोग्य अधिकारी व स्थानिक नगरसेवकांनी या गोष्टीची दखल घ्यावी, अशी माफक अपेक्षा रहिवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.