पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ऊर्जाबचतीसाठी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात महापालिकेचे अधिकारी आणि महावितरणचे प्रमुख यांच्यात बैठक झाली. या वेळी वीजबिले वेळेवर मिळत नाहीत, दुरुस्त्याही करून दिल्या जात नाहीत, अशी तक्रार महापालिकेच्या वतीने करण्यात आली. फोटो रीडिंगनुसार वीजबिले देण्यात येतील. तसेच चुकीची बिले दिल्यास कडक कारवाई केली जाईल, असेही महावितरणने या वेळी सांगितले. वीजबचतीच्या केल्या जाणाऱ्या उपाययोजना यावर चर्चा झाली.महावितरण आणि महापालिकेच्या विद्युत विभागाच्या वतीने आज बैठक घेण्यात आली. या वेळी महापालिकेचे सहशहर अभियंता आणि विद्युत विभागाचे प्रमुख प्रवीण तुपे, महावितरणचे मुख्य अभियंता आर. डी. मुंडे, महापारेषणचे एम. व्ही. दिवाकर, वित्त विभागाचे सरव्यवस्थापक ए. व्ही. गांगुर्डे, पिंपरीचे कार्यकारी अभियंता एस. आर. वायफळकर, भोसरीचे अभियंता एस. एल शिंदे, महापालिकेचे अभियंता एस. एस. चव्हाण, संजय खाबडे, नितीन देशमुख, एकनाथ पाटील आदी उपस्थित होते. या वेळी महापालिकेच्या प्रतिनिधींच्या वतीने वीज मंडळाविषयी विविध समस्या मांडल्या. ‘ऊर्जा बचतीचे धोरण महापालिकेने स्वीकारले आहे, त्यासाठी उपाययोजनासाठी प्रयत्न सुरू असल्याचे तुपे यांनी सांगितले. महापालिकेस सरासरी आणि चुकीच्या रीडिंगची बिले मिळतात. बिलांची दुरुस्तीही वेळेवर केली जात नाही, अशी तक्रार केली. त्यावर मुंडे यांनी प्रशासनास सूचना केल्या. महापालिकेला फोटोनुसार रीडिंग देण्याची गरज आहे. पुढील महिन्यापासून पालिकेच्या तक्रारींचे निवारण करावे, अशा सूचना दिल्या. स्ट्रीट लाइट, गार्डन, इमारती व अन्य बिले एकत्रितपणे देण्याची सूचना करण्यात आली. (प्रतिनिधी)
चुकीच्या बिलांवर कडक कारवाई
By admin | Published: April 29, 2017 4:14 AM