चिंचवड - रात्री-अपरात्री अचानक दगड पडत असल्याने चिंचवडमधील नागरिक भयभीत झाले आहेत. घरांवर व परिसरात कोणीतरी मोठमोठे दगड फेकत असल्याने याचा शोध घेण्यासाठी नागरिकांना रात्रभर जागावे लागत आहे. अनेक घरांचे पत्रे फुटले असून, या घटनेत तीनजण जखमी झाले आहेत. या प्रकाराचा छडा लावून हे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.चिंचवडमधील तालेरानगर व भीमनगर भागात गेल्या २५ दिवसांपासून दगड पडत आहेत. रात्री-अपरात्री घडणाºया या प्रकारामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिसांना या ठिकाणी पाचारण करण्यात आल्यानंतर पोलिसांसमोरही दगड पडले आहेत. तरीही याचातपास करण्यात पोलिसांकडून दिरंगाई होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.या भागात काही बैठी घरे, तर काही मोठ्या इमारती आहेत. कोणत्याही क्षणी या भागात दगड फेकले जात असल्याने येथील नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. या घटनेत काही घरांचे पत्रे फुटले असून, एका व्यक्तीसह दोन लहान मुले जखमी झाले आहेत. दगड फेकणाºयांचा शोध घेण्यासाठी कार्यकर्ते रात्रभर परिसरात गस्त घालत आहेत. मात्र दगड कोठून येतात याचा अंदाज येत नसल्याने अडचणी येत आहेत.छतावर दगडांचा खचयेथील अनेक घरांवर दगडाचे खाच पडले आहेत. घराबाहेर खेळणारी मुले या घटनेत जखमी झाली आहेत. परिसरात दहशत पसरली असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.पोलिसांनी झटकली जबाबदारीदगडफेकीच्या घटनेने येथील नागरिक संतप्त झालेले आहेत. या नागरिकांनी पोलिसांना या प्रकाराबाबत माहिती दिली. दगडफेक करणाºयांना पकडून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. मात्र, पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. तुम्हीच लक्ष ठेवून दगड फेकणाºया व्यक्तींना आमच्या ताब्यात द्या, असा सल्ला पोलिसांनी दिल्याच्या तक्रारी परिसरातील महिला करीत आहेत. पोलिसांच्या या बेजबाबदार उत्तरांमुळे सामान्य नागरिक अधिक संतप्त झाले आहेत.
चिंचवडमध्ये घरांवर दगडफेक, स्थानिक रहिवासी भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 3:57 AM