चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी जोरदार हालचाली; काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार इच्छुक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 09:56 AM2023-01-23T09:56:47+5:302023-01-23T09:57:03+5:30
दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांच्या बैठकीनंतर उमेदवार जाहीर होणार
पुणे : चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभेची जागा रिक्त झाली. त्यानंतर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. चिंचवड मतदार संघात या जागेसाठी जोरदार हालचाली सूर झाल्या आहेत. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार इच्छुक असल्याचे सांगण्यात आले आहे. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांच्या बैठकीनंतर उमेदवार जाहीर होणार आहेत.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढविण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढविण्यास इच्छुक आहे. तसा ठराव करण्यात आला आहे. याबाबत शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले यांनी माहिती दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन भोसले यांच्या उपस्थितीत शनिवारी बैठक झाली. यावेळी पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, उपजिल्हाप्रमुख, उपशहर प्रमुख, विधानसभा प्रमुख, महिला पदाधिकारी उपस्थित होते.
भोसले म्हणाले, ‘‘चिंचवड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सहा नगरसेवक आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा सर्वधर्मीय मतदार या मतदारसंघात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त करून यापूर्वीच्या निवडणुकीत शिवसेनेने नगरसेवक निवडून दिलेले आहेत. पाच ज्येष्ठ पदाधिकारी ही निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. तसेच इतर पक्षातील इच्छुकांनी देखील संपर्क साधला आहे. शिवसैनिकांची ही मागणी आपण संपर्क नेते आणि ज्येष्ठ नेत्यांपुढे मांडू.’’
चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार देण्याची तयारी
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेसने याठिकाणी उमेदवार उभा करावा, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे. याबाबतच्या कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविणार आहे. त्यानंतर पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील तो पाळला जाईल, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेल यांनी आज सांगवी तेथे सांगितले. खासदार राहुल गांधी यांचे भारत जोडो अभियान अंतिम टप्प्यात आहे. दि. २६ जानेवारीपासून देशभर ‘हात से हात जोडो’ हे अभियान सुरू करण्यात येणार आहे. यानिमित्त नवी सांगवी येथे शहर काँग्रेसची आढावा बैठक झाली.
चिंचवड विधानसभा निवडणूक लढवण्याविषयी आग्रह धरणार
चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार उभा करावा, असा ठराव बैठकीत संमत केला. ही निवडणूक लढण्यासाठी दोन महिला आणि चार पुरुष पदाधिकारी तीव्र इच्छुक आहेत. यापूर्वी काँग्रेसने विधानसभा निवडणूक लढवली आहे. सोमवारी पुण्यामध्ये समताभूमी येथून हात से हात जोडो अभियानाचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी चिंचवड विधानसभा निवडणूक लढवण्याविषयी आग्रह धरणार आहे. - डॉ. कैलास कदम, शहराध्यक्ष