पिंपरी : आधार कार्ड क्रमांक न आणल्याने पाचवीत शिकणा-या विद्यार्थ्याला जबर मारहाण करणारा किशोर खरात हा शिक्षक फरार झाला आहे. त्यामुळे अद्याप अटक झाली नसल्याची माहिती चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिली.श्रीधरनगर (चिंचवड) येथील एमएस माटे शाळेत मागील महिन्यात विद्यार्थ्याला जबरी मारहाण केल्याची घटना घडली. शनिवारी याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण करणा-या शिक्षकावर बाल न्याय, बाल संरक्षण कायदा कलम ७५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पथक शिक्षकाच्या मागावर आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्याचे कळताच शिक्षकाने पलायन केले आहे.चिंचवड येथील माटे शाळेतील मुलांना आधारकार्ड क्रमांक घेऊन येण्यास सांगितले होते. श्रीशांत मल्लिकार्जुन बेळ्ळे या पाचवीतील विद्यार्थ्याने आधारकार्ड क्रमांक आणलाच नाही. या कारणावरून शिक्षकाने त्या विद्यार्थ्याच्या पायावर लाकडी छडीने मारल्याची तक्रार करण्यात आली आहे.विद्यार्थ्याच्या पालकांना सीसीटीव्ही फुटेज दाखविण्याची तयारी आहे. मात्र त्याचे पालक फुटेज पाहण्यास नकार देत आहेत. फुटेजमध्ये असा काही प्रकार घडल्याचे दिसून येत नाही. मैदानावरून येतानाच श्रीशांत लंगडत आला असल्याचे विद्यार्थी सांगतात. त्यामुळे शाळेतील कोणी शिक्षकाने असा काही मारहाणीचा प्रकार केलेला नाही. कोणताही शिक्षक दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. - इंद्रायणी माटे-पिसोळकर, मुख्याध्यापिका
विद्यार्थ्याला मारहाण करणारा शिक्षक फरार, चिंचवड येथील घटना, पोलीस पथक मागावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 6:06 AM