पुणे - आधार कार्डची माहिती न दिल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. शिक्षकाने केलेल्या बेदम मारहाणीत विद्यार्थ्याच्या गुडघ्याला गंभीर जखम झाली असून, त्याच्यावर सर्जरी करण्यात आली आहे. विद्यार्थ्याच्या पालकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चिंचवडमधील मोरया शिक्षण संस्थेत ही घटना घडली आहे. ही घटना काही आठवड्यांपुर्वी घडली आहे, मात्र रविवारी जेव्हा विद्यार्थ्याच्या पालकांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार केली त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांनी खरात या शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांचं पुर्ण नाव कळू शकलेलं नाही.
शिक्षकाने त्यांच्या मुलाकडे आधार कार्डची माहिती कशासाठी मागितली याबद्दल काहीच माहिती नसल्याचं पालकांनी सांगितलं आहे. 'माझ्या माहितीप्रमाणे शाळा एक मोबाइल अॅप्लिकेशन सुरु करण्याचा विचार करत आहे. जेणेकरुन पालकांना सर्क्युलर आणि नोटिफिकेशन पाठवता येतील. या अॅप्लिकेशनसाठी त्यांना आधार कार्डची माहिती हवी असावी असा अंदाज आहे. पण आमच्या मुलाला मारण्याची काहीच गरज नव्हती', असं विद्यार्थ्याची आई संगीता बेल्ले यांनी सांगितलं आहे.
पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, '6 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान एका खासगी रुग्णालयात त्यांच्या मुलाला दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. 'आम्हाला घटलेल्या प्रकाराबद्दल सांगायलाही तो घाबरत होता. चालताना त्याला त्रास होत असल्याने आम्ही त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो. जेव्हा रुग्णालयात सर्जरी करण्यासाठी त्याला दाखल करण्यात आलं, तेव्हा त्याने आम्हाला शिक्षकाकडून मारहाण झाल्याचं सांगितलं. यानंतर आम्हालाही धक्का बसला होता'.
मुलाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पोलीस सध्या घटनेचा तपास करत असून, अजून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.