मोशी : सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांची उत्तरे महापालिकेच्या मोशी शाळेतील विद्यार्थ्यांना देता आली नाहीत. ही बाब गंभीर आहे. यावरून शाळेची गुणवत्ता आणि शैक्षणिक दर्जा घसरल्याचे दिसून येते. त्यामुळे या शाळेतील शिक्षकांचीच ‘शाळा’ घ्यावी लागणार आहे, असे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.
महापालिका विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच अन्य सुविधाही पुरवित आहे. त्याचा लाभ पूर्णपणे विद्यार्थ्यांना होतो किंवा नाही, याची पाहणी महापौर जाधव यांच्याकडून करण्यात आली. त्यानुसार महापालिकेच्या मोशी येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेला त्यांनी भेट दिली. शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे, नगरसेविका सुवर्णा बर्डे, नगरसेविका विनया तापकीर, नगरसेवक सागर हिंगणे, शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकारी ज्योत्सना शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी या वेळी संवाद साधला. सामान्य ज्ञानावरील आधारित काही प्रश्न त्यांनी विद्यार्थिनींना विचारले. मात्र विद्यार्थिनींना या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, वंदे मातरम्ही या विद्यार्थिनींना अवगत नसल्याचे या वेळी निदर्शनास आले. शाळेतील ई-लर्निंग विभागाचीही त्यांनी पाहणी केली.