पिंपरी : मराठी भाषा रसाळ आहे. कथा, कविता, कादंबरी वाचल्याने जीवन घडते. नारायण सुर्वे, अण्णा भाऊ साठे यांसारख्या लेखकांच्या कविता, कादंब-या मुलांनी वाचल्या पाहिजेत. त्यासाठी पुस्तकांशी मैत्री करा, असे विचार बालकुमार साहित्य संमेलनात गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.श्री शिवछत्रपती शिवाजीराजे विद्यालय, चिंचवड व महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी यांच्या वतीने ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित बालकुमार साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. साहित्य संमेलनाची सुरुवात बालकुमार दिंडीने झाली. ग्रंथदिंडीत विद्यालयातील विद्यार्थी विविध वेशभूषांत सहभागी झाले होते. ग्रंथदिंडीतील पालखीमध्ये गाथा, भगवद्गीता, ग्रामगीता, श्यामची आई इत्यादी पुस्तके ठेवण्यात आली होती. संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताई, संत तुकाराम, संत गाडगेमहाराज या संतांची तर महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजीमहाराज, भारतमाता, झाशीची राणी अशा महान व्यक्तींची वेशभूषा करून विद्यालयातील मुले दिंडीत सहभागी झाले होते. तसेच महाविद्यालयातील लेझीम पथकही दिंडीत सहभागी झाले होते. शाळेच्या आवारात दिंडी पोहोचताच दिंडीचे पूजन करण्यात आले.बालकुमारच्या दिंडीनंतर उद्घाटनाचा सोहळा पार पडला. बालवर्गातील विपुदा जतकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी गिरीश प्रभुणे, उपमहापौर शैलजा मोरे, संमेलनाचे अध्यक्ष अनुराधा प्रभुदेसाई, स्वागताध्यक्ष रामचंद्र जाधव, महाराष्ट्र साहित्य परिषद कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, मुख्य कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह उद्धव कानडे, सुदाम भोरे आदी उपस्थित होते.या वेळी विपुदा जतकर हिने कथाकथनामध्ये चल रे भोपळ्या टुणूक टुणूक ही कथा सादर केली. तसेच आसाम येथे झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या प्रियांशु शेळके यांचा विशेष सत्कार करण्यात आला.स्वागताध्यक्ष रामचंद्र जाधव यांच्यासह उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. विंदा करंदीकर यांच्या ‘देणाºयाने देत जावे घेणाºयाने घेत जावे’ या पद्यपंक्तीने उद्घाटन सोहळ्याचा समारोप झाला.प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले, तर मुरलीधर साठे, विजय जाधव, पुरुषोत्तम सदाफुले, मुकुंद आवटे, अनिल कर्पे, रोहित खर्गे, मुख्याध्यापक बाळाराम पाटील, मुख्याध्यापिका प्रतिभा देशपांडे यांनी संयोजन केले.
विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करण्याची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 2:12 AM