पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वाहनांची तोडफोड करून स्टंटबाजी करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. दहशत माजविण्यासाठी वाहने फोडायचे आता फॅडच निर्माण झाले आहे. हे प्रकार रोखण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. शहरात औद्योगिकीकरणासह नागरीकरणही वाढले. दरम्यान, शहर व परिसरातील जमिनींना चांगला भाव आला. यातून काही ‘गुंठामंत्री’ उदयास आले. अनेकांनी आपला दबदबा निर्माण करण्यासाठी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. स्वत:चे गट स्थापन केले असून, त्यातून काही टोळ्या उदयास आल्या. अशाच काही टोळक्यांकडून पिंपरी, भोसरी, निगडी, आकुर्डी, थेरगाव या भागात अनेकदा कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, सोनसाखळी चोरी या गुन्ह्यांसह आता वाहन तोडफोडीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे वाहने घरासमोर उभी करावीत की नाही, असाच प्रश्न निर्माण झाला आहे. काही मुले एकत्र येऊन गु्रप तयार करतात. त्यास वेगळ्या पद्धतीचे नावही दिले जाते. त्यानंतर ग्रुपचे नाव ओळखले जावे यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढविल्या जातात. दुचाकीची मोठ्या आवाजात फायरिंग करून १५-२० दुचाकी एकत्रित फिरविणे. मोठमोठ्या आवाजात ओरडणे, पादचाऱ्यांना त्रास देणे अशा प्रकारचे उद्योग केले जातात. यातही भागत नाही म्हणून की काय विनाकारण वाहनांची तोडफोड करण्याचेही प्रकार सुरू आहेत. (प्रतिनिधी)काही जण दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड करतात. पूर्ववैमनस्यातून टोळक्याने रस्त्यावर येत राग व्यक्त केला जातो. यामध्ये सर्वप्रथम ‘टार्गेट’वर असतात ती रस्त्यावरील वाहने. काचा फोडणे, दरवाजा तोडणे, मोटारीवर दगड मारणे यांसह लाठ्या-काठ्या घेऊन गुंडांचे टोळके दहशत माजवीत आहे. आकुर्डीतील साईनाथनगर येथे वाहन तोडफोडीचा प्रकार उघडकीस आला. अनेक जण इमारतीच्या वाहनतळात वाहन लावतात, तर काहींना वाहनतळात जागा उपलब्ध नसल्यास रस्त्यावरच वाहने उभी करतात. नेहमीप्रमाणे घरासमोर वाहन उभे केल्यानंतर वाहनमालक बिनधास्त जातात. वाहनांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून वाहनाला लक्ष्य कले जात आहे.
निवडणुकीच्या तोंडावर वाहन तोडफोडीची ‘स्टंटबाजी‘
By admin | Published: November 09, 2016 2:39 AM