लोणावळा : सहकारी औद्योगिक वसाहतींमधील लघुउद्योगांना नव्याने उभारी देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.राज्य सहकारी औद्योगिक वसाहत फेडरेशन व लोणावळा औद्योगिक सहकारी वसाहत लोणावळा यांच्या वतीने राज्यभरातील सहकारी औद्योगिक वसाहतीच्या समस्या जाणून घेण्याकरिता लोणावळ्यातील बैठकीला सहकारमंत्री देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.राज्य सहकारी औद्योगिक वसाहत फेडरेशनचे अध्यक्ष सचिन पाटील, माजी आमदार कृष्णराव भेगडे, गुलाबराब म्हाळसकर, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, बाबा शेट्टी, जयश्री आहेर, देविदास कडू, देवराम लोखंडे, प्रकाश कोटनिस, मिलिंद अत्रे आदी उपस्थित होते. माजी आमदार कृष्णराव भेगडे व फेडरेशनचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी सहकारी औद्योगिक वसाहतींच्या समस्या मंत्र्यांच्या समोर मांडल्या.सहकारमंत्री देशमुख म्हणाले, सहकारी वसाहतीमधील उद्योगांनी आर्थिक अडचण सोडविण्यासाठी एमसीडीसीचे सदस्य व्हावे म्हणजे कर्जाचा व व्याजदराचा प्रश्न मिटेल. मागील २० वर्षांपासून सहकार विभाग व शासन यांच्या दुर्लक्षित धोरण व पाठपुराव्या अभावी सहकारी संस्था बेवारस झाल्या असून, त्यांच्यासमोर समस्या निर्माण झाल्या आहेत.यापुढील काळात मात्र या संस्थांना महाराष्ट्रात नावलौकिक मिळवून देण्याकरिता कसोशिने प्रयत्न करणार आहे. त्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी त्यांना लागणारा कच्चा माल, कुशल कामगार, अल्पदरात वीज अथवा सौरऊर्जा, उत्पादित मालाकरिता बाजारपेठ या गोष्टी उपलब्ध करुन देण्यावर सहकार विभागाचा भर असणार आहे.