लोणावळा : मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या जलाशयात रविवारी सायंकाळी बुडालेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मृतदेह शोधण्यात लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकाला सोमवारी यश आले. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.पुण्यातील जेएसपीएम महाविद्यालयात शिकणारा जितेश पगारे (वय १९, रा. नाशिक. सध्या राहणार कर्वेनगर, पुणे) व लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयात शिकणारा अनिकेत निकम (वय २०, रा. साक्री धुळे. सध्या राहणार सिंहगड कॉलेज लोणावळा) अशी या मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. जितेश व अनिकेत हे त्यांच्या मित्रांच्या समवेत रविवारी सायंकाळी पवना धरण परिसरात जलविहार करत असताना धरणाच्या जलाशयात बुडाले होते. स्थानिक नागरिक, शिवदुर्ग मित्र व लोणावळा ग्रामीण पोलीस यांनी रविवारी सायंकाळी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते मिळून आले नाहीत. सोमवारी सकाळपासून शिवदुर्गचे अजय शेलार, प्रवीण देशमुख, विकास मावकर, अमोल परचंड, राजू पाटील, नागेश इंगुळकर, दिनेश पवार, विशाल शेलार, सागर कुंभार, अजय राऊत, आनंद गावडे, महिपती मानकर, महेश मसने, प्रशांत इकारी, हनुमंत भोसले, हरिश्चंद्र गुंड, सुनील गायकवाड यांच्या टीमने शोधकार्याला सुरुवात केली. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शिवदुर्गच्या पथकाला मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले. (प्रतिनिधी)
मृतदेह शोधण्यात यश
By admin | Published: April 25, 2017 4:03 AM