विलास शेटे / मंचरटोमॅटोचे यशस्वी पीक घेतल्यानंतर तेथेच चवळी पिकाचे यशस्वी उत्पादन लांडेवाडी येथील शेतकरी प्रवीण शिवाजी आढळराव पाटील यांनी घेतले आहे. तीस गुंठे क्षेत्रात घेतलेल्या चवळी पिकाचे तीस तोडे झाले आहे. त्यातून सव्वा लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. दोन पिकांनंतर उन्हाळी बाजरीचे पीक प्रवीण आढळराव घेणार आहेत. या तिसऱ्या पिकाची तयारी त्यांनी सुरू केली आहे.लांडेवाडी गावच्या खिळेमळा येथे राहणारे प्रवीण शिवाजी आढळराव यांना दहा एकर शेती आहे. या शेतीत कांदा, बटाटा, टोमॅटो, मका अशी ठोक पिके ते घेतात. शेतीबरोबर दुग्धव्यवसाय जोपासला आहे. दहा गाई असून दर दिवशी चांगले दूध संकलन होते. माथा नावाच्या शेतीत ३० गुंठे क्षेत्रात सुरुवातीस टोमॅटो पीक आढळराव पाटील यांनी घेतले. १०५७ जातीच्या टोमॅटो पिकाची लागवड केली. इतर शेतकऱ्यांना टोमॅटोच्या बनावट बियाण्याचा फटका बसत असताना आढळराव यांचे टोमॅटो पीक चांगले आले. मल्चिंग व ठिबकचा वापर करण्यात आला होता. टोमॅटो पिकातून दोन लाख रुपयांचे उत्पादन निघाले.टोमॅटो पिकाचा मांडव तयार होता. त्याच ठिकाणी चवळी पीक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. गोमती अंकुर जातीच्या चवळी पिकाची लागवड टोमॅटोच्या सरीवर करण्यात आली. ड्रीपद्वारे खताची मात्रा देण्यात आली. मावा व किडीच्या नियंत्रणासाठी औषधफवारणी करण्यात आली. लागवडीनंतर दोन महिन्यांत चवळी पीक तोडणीस आले. हे पीक मल्चिंग पेपरचा वापर करून घेण्यात आल्याने खुरपणीचा खर्च वाचला होता. चवळी पीक लहान असताना एकदा तणनाशक मारण्यात आले. चवळी पिकाच्या यशस्वी उत्पादनानंतर प्रवीण आढळराव आता तिसऱ्या पिकाच्या तयारीला लागले आहेत. याच शेतात बीमोड व्हावा म्हणून ते उन्हाळी बाजरीचे पीक घेणार आहेत. बाजरी पिकाची तयारी त्यांनी सुरू केली आहे.
टोमॅटोनंतर चवळीचेही घेतले यशस्वी उत्पादन
By admin | Published: January 09, 2017 2:04 AM