निगडी : निवडणुकीसाठी शहरात विविध साधनांचा वापर करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न महापालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून केला जात आहे. शहरातील प्रत्येक प्रभागातील उमेदवार लोककलाकारांच्या पथकांचा वापर करून तसेच चौकाचौकात, सोसायट्यांमध्ये पथनाट्य सादर करून प्रचाराचे तंत्र राबविण्यात येत आहे. भल्या पहाटे येणारा वासुदेव उमेदवारांचा जागर करीत आहे. हायटेक प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून उमेदवारांकडून राबविण्यात येत आहे. मात्र स्मार्ट सिटी- उपनगर असा दुहेरी भागांचा समावेश असलेल्या मतदारसंघात लोककलाकारांच्या माध्यमातून प्रचाराची शक्कल उमेदवार लढवीत आहेत. प्रभागात गटागटाने लोककलाकार व पथनाट्य सादर करणारे कलाकार नियुक्त करण्यात आलेले आहेत. यामध्ये सहा ते सात जणांच्या गटाचा समावेश असून, पहाटेपासूनच या प्रचाराला सुरुवात केली जात आहे. लोककलाकारांच्या कलेचाही आस्वाद मतदाराला मिळत आहे. पथनाट्याच्या माध्यमातून उमेदवाराचा परिचय, पक्षाची भूमिकाही व पक्षाने दिलेले अधिकृत चिन्ह अशी माहिती मतदारांपुढे मांडली जात आहे. अनेकदा पथनाट्य हे प्रभावी माध्यम म्हणून सिद्ध झालेले आहे. त्यामुळे या प्रभावी माध्यमाचा वापर करून वेगळ्या पद्धतीचा प्रचार केला जात आहे. अशा प्रचाराला मतदार व जनतेकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पथकात युवक व युवतींचा समावेश असून वेगवेगळ्या जिल्ह्यांतील ही तरुण मंडळी असून, निवडणुकीच्या निमित्ताने लोककलाकारांनाही रोजगार उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे २०१७ च्या निवडणुकीत फेसबुक, व्हॉट्सअॅप अशा नेटकरी तरुणांपर्यंत पोहोचण्याबरोबरच लोककलेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंतही पोहोचण्याचा मार्ग आता उमेदवारांनी निवडला आहे. (वार्ताहर)
निवडणुकीमुळे लोककलावंतांना आले सुगीचे दिवस
By admin | Published: February 15, 2017 2:01 AM