पिंपरी : पालकांना शाळेत घेऊन, असे शिक्षकांनी सांगितले. त्यानंतर दहावीतील विद्यार्थी शाळेतून निघाला. मात्र, तो घरी गेलाच नाही. चार दिवसांनंतर त्याचा मृतदेह मुळा-मुठा नदीपात्रात आढळून आला. त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पिंपरी-चिंचवड येथील रुपीनगर येथे हा धक्कादायक प्रकार घडला.
अर्पित सूर्यकांत दुबे (१५, रा. पीसीएमसी काॅलनी, निगडी ), असे मृतदेह सापडलेल्या मुलाचे नाव आहे. चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पित हा रुपीनगर येथील ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत इयत्ता दहावीत शिकत होता. तो २७ जुलै रोजी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेला. त्यावेळी काही विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना शाळेत घेऊन येण्याबाबत शिक्षकांनी सांगितले. त्यात अर्पित याला देखील पालकांना शाळेत घेऊन येण्याबाबत सांगण्यात आले. इतर विद्यार्थी पालकांना घेऊन शाळेत पोहचले. मात्र, अर्पित शाळेत परतला नाही. त्यामुळे शिक्षकांनी त्याच्या पालकांशी संपर्क साधला. तो घरी पोहचला नसल्याचे पालकांनी सांगितले. त्यानंतर पालकांनी चिखली पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार अर्पित याच्या अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, अर्पित याचा शोध सुरू असताना गुरुवारी (दि. १) सकाळी अकराच्या सुमारास लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत खराडी येथील पंचशील टाॅवर जवळ मुळा-मुठा नदीपात्रात एक मृतदेह आढळून आला. शालेय गणवेशातील एका मुलाचा मृतदेह होता. शालेय गणवेशावर ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, रुपीनगर, पिंपरी-चिंचवड असा बॅच होता. त्यावरून लोणीकंद पोलिसांनी चिखली पोलिसांशी संपर्क साधला. तसेच मृतदेह पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आला. ओळख पटवून मृतदेह अर्पित याचाच असल्याचे समोर आले.
‘सीसीटीव्ही’मध्ये कैद
अर्पित हा शाळेतून बाहेर पडल्यानंतर एका रिक्षाने भक्तीशक्ती चौकात आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजवरून समोर आले. मात्र, तेथून तो कुठे गेला याचा शोध पोलिसांकडून सुरू होता.
सलग दुसरी घटना
गेमिंग टास्कच्या नादात किवळे येथील १५ वर्षीय मुलाचे इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार २६ जुलै रोजी घडला. त्यानंतर निगडी येथील अर्पित दुबे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. पिंपरी-चिंचवड शहरात दहावीतील विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याची एकाच आठवड्यातील सलग दुसरी घटना समोर आली. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.