पिंपरी : आमची निगडी पोलीस स्टेशनला तक्रार घेतली नाही, असा आरडाओरडा करीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी ५० वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार हनुमंत बांगर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बांगर हे गार्ड अंमलदार म्हणून हजर असताना संबंधित फिर्यादी महिला एका पुरुषासोबत त्याठिकाणी आली. निगडी पोलीस स्टेशनला तक्रार घेतली नाही असा मोठमोठ्याने आरडाओरडा करुन आता मी इथेच जीव देते असे म्हणत आत्महत्या करण्यासाठी बाटलीत सोबत असलेले रॉकेल अंगावर ओतून घेतले. त्यानंतर पिशवीतून काडीपेटी काढली असता त्याठिकाणी असलेले फिर्यार्दी बांगर व पोलीस शिपाई गोरखे यांनी महिलेकडील रॉकेलची बाटली व काडीपेटी ताब्यात घेतली. तसेच तिला आत्महत्या करण्यापासून रोखले. दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी या महिलेवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 2:59 PM