वडगाव मावळ : आंदर मावळातील वडेश्वर येथील डोंगरावर असलेल्या सटवाईवाडीत एक आदिवासी विद्यार्थ्याने मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली. संदिप एकनाथ हेमाडे (वय १३ रा.सटवाई वाडी ) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. आत्महत्याचे कारण समजु शकले नाही. वडगाव पोलीस ठाण्याचे हवलदार आर. बी. कर्डिले यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिप वडेश्वर येथील आश्रम शाळेत शिकत होतो. त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. मंगळवारी सकाळी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आदिवासी समाजातील एकनाथ हेमाडे यांचा एकुलता एक मुलगा संदिप होता. त्यांच्या मुलीचे लग्न २४ तारखेला कान्हे येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात झाले होते.मुलाला शिकवून त्याला काहीतरी मोठे करायचे. ही जिद्द वडिलांनी बाळगून परिस्थिती बिकट असूनही दहावीपर्यत शिक्षण दिले . .............. जिवंत आहे की मृत्यू पावला हे सांगु शकत नाही, तपासायची मशिन नाही शवविच्छेदनसाठी मृतदेह कान्हे फाटा येथील शासकीय रूग्णालयात आणला. तेथील डॉक्टर म्हणाले, आमच्याकडे चेकिंग करायची मशिन नसल्याने व्यक्ती जिवंत आहे की मृत्यू पावला हे सांगता येणे कठीण आहे. यामुळे शासकीय रूग्णालयात एक तास मृतदेह घेऊन बसावे लागले. शेवटी रुग्णवाहिकामधून तो मृतदेह वडगाव पोलीस ठाण्यात आणला.पोलिसांनी शवविच्छेदनासाठी तळेगाव येथील शासकीय रूग्णालयात पाठवले.याठिकाणी आदिवासी समाजातील गुलाब गभाले, कुबाजी मोरमारे, प्रताप कोकाटे, अरूण चिमटे, बाळू हेमाडे यांनी माहिती दिली.
याबाबत पोलिसांनी सांगितले, एखाद्याचा मृत्यू झाला तर कान्हे शासकीय रूग्णालय जवळ असल्याने त्याठिकाणी शवविच्छेदनासाठी आम्ही घेऊन जातो. परंतू, तेथे काहीतरी कारण सांगून शवविच्छेदन करण्यास नेहमी टाळाटाळ केली जाते, असा आरोप पोलिसांनी केला.