चिंचवड : अलौकिक द्रुपदधमार गायकीने रसिक मंत्रमुग्ध झाल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित स्वरसागर संगीत महोत्सवात दिसून आले. स्वरसागर महोत्सवाचा दुसरा दिवसही संगीतमय वातावरणात, उत्साहात पार पडला. पालिकेच्या संभाजीनगगर, संगीत अकादमी, संत तुकारामनगर व चिंचवड या चार शाखांतील विद्यार्थ्यांनी हार्मोनियम, तबलावादन, शास्त्रीय गायन व सुगम संगीत सादर केले. स्वाती काशीकर हिने भरतनाट्यम् करत नृत्यकौैशल्य दाखविले. पूजा शेलार, वृषाली पांचाळ, सोनम मालुसरे व दामिनी जाधव यांनी राग बिहाग तर सोहम काशीद व बाळू सोनावणे यांनी राग केदार गात रसिकांची वाहवा मिळवली. प्रतीक जथन, प्रवीण नेवपूरकर, शोभा लोंढे व ओंकार रणधिर या विद्यार्थ्यांचे गायन उल्लेखनीय ठरले. विनोद सुतार, प्रसाद भाग्यवंत व समर्थ नेटके यांनी तबल्यावर, दीपा मोहिते व मिलिंद दलाल यांनी हार्मोनियम व मणीप्रताप सिंग यांनी तालवाद्यावर साथ केली. स्थानिक कलाकार पृथ्वीराज इंगळे या विशेष मुलाने सादर केलेले शास्त्रीय गायन प्रेक्षकांना थक्क करणारे ठरले. तालयोगी पंडित सुरेश तळवळकर व सत्यजित तळवळकर यांनी तबल्यावर साथ केली. पालिकेच्या संगीत कला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी व स्थानिक कलाकारांनी सुर, ताल व लय यांचे उत्कृष्ट सादरीकरण करीत कला सादर केली. विद्यार्थ्यांनी संगीतमय केलेल्या वातावरणात उत्कृष्ट सतारवादक निलाद्रीकुमार यांचे सतारवादन झाले. कुमार यांनी राग हेमंत आळवत सतार वादनास सुरुवात केली. सतारीवरील रागाच्या झंकारात रसिक मंत्रमुग्ध झाले. सतार वादन करण्यात एकाग्र झालेले कुमार यांना पाहण्यात आणि वादनातून उमटणारे सूर ऐकताना रसिक अक्षरश: भारावून गेले. सतार वादनाने रसिकांना अविस्मरणीय अनुभव दिला. सतारवादनाने झंकारमय झालेले वातावरण रमाकांत आणि उमाकांत गुंदेचा बंधूंच्या गायनाने आणखी खुलले. त्यांनी संगीत क्षेत्रातील द्रुपदधमार गायकीचा साक्षात्कार संगीत प्रेमींना करून दिला. राग जोग यातील ‘सूर को प्रमाण जान’ हे ध्रुपद गात त्यांनी सुरुवात केली. नंतर ‘झिनी झिनी चदरिया’ हा कबीरांचा दोहा चारुकेशी रागामध्ये सादर केला. मालकंस रागातील ‘शंकर गिरिजापती’ ही शिवस्तुती गायली. त्यांच्या अद्भूत गायकीने रसिक भारावून गेले. डॉ. चारुदत्त देशपांडे यांनी तानपुरा व ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी पखवाजवर साथ केली. (वार्ताहर)
अलौकिक सतारवादन, विलक्षण गायकी
By admin | Published: December 24, 2016 12:38 AM