पिंपरी : शेतकऱ्यांचा माल विदेशात गेला तर त्याला चांगला भाव मिळेल. त्यामुळे सरकारने आयात-निर्यात धोरणात स्पष्ट भूमिका घेतली, तर एकही जागा न मागता एनडीएला पूर्ण ताकदीने पाठिंबा देऊ, असे प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सांगितले, तसेच कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारने लावलेले ४० टक्क्यांचे शुल्क चुकीचे असून, त्याविरोधात आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.
चिंचवड येथे “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी” या अभियानाचे आयोजन केले आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, पिंपरी महापालिका समाजकल्याण विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, विठ्ठल जोशी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट आदी उपस्थित होते. यावेळी कडू बोलत होते.
कडू म्हणाले, कांदा नाही खाल्ला तर कोणी मरणार नाही; पण शेतकऱ्यांचे नुकसान का करता. कांद्यावर निर्यात शुल्क लावण्याची गरज नव्हती. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरची व्यवस्था तुम्ही आज करून ठेवताय? एवढी घाई कशासाठी केली जात आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार कांद्याचे भाव वाढल्याने पडल्यामुळे असे केले जात आहे.
शासनाने दिव्यांगांसाठी मंत्रालय सुरू करण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे. हा निर्णय मनाला आनंद देणारा आहे. दिव्यांगांच्या अनेक समस्या आहेत, त्या दूर करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. दिव्यांगांच्या तक्रारी दूर होणे हे प्रशासनाचे यश आहे आणि त्यांची समस्या दूर झाल्यानंतर हृदयापासून मिळणारे आशीर्वाद लाखमोलाचे आहेत. महिन्यातून केवळ एक दिवस दिव्यांग बांधवांसाठी दिल्यास त्यांच्या समस्या दूर करता येतील.